उल्हास नदीतील उपलब्ध पाणी साठय़ाचे नियोजन करण्यासाठी कळवा लघु पाटबंधारे विभागाने १४ टक्के पाणीकपात लागू केल्याने ठाणे शहरातील काही भागांचा पाणी पुरवठा बुधवारी बंद रहाणार आहे, तसेच या बंदमुळे पुढील दोन दिवस या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
उल्हास नदीच्या पात्रातून पाणी उचलणाऱ्या स्टेम पाणी पुरवठा कंपनीमार्फत ठाणे शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. लघु पाटबंधारे विभागाने १४ टक्के पाणी कपात लागू केल्याने दर बुधवारी स्टेम पाणीपुरवठा बंद ठेवते. परिणामी, ठाणे शहराचा पाणीपुरवठा दर बुधवारी बंद राहतो. मात्र, महापालिकेने पाणी पुरवठय़ाचे विभागवार नियोजन केल्याने शहरवासियांना १५ दिवसांतून पाणी कपातीचे झळ बसते.
दरम्यान, १४ टक्के कपातीमुळे बुधवारी, २७ मे सकाळी ९ ते गुरुवार, २८ मे सकाळी ९ या कालावधीत ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद रहाणार असून त्यामध्ये सिद्धेश्वर, ऋतू पार्क, उथळसर, नौपाडा, वृंदावन, श्रीरंग, पाचपखाडी, चरई, खारटन रोड, महागिरी, साकेत कॉम्पलेक्स, कळवा, खारेगाव, रेतीबंदर व मुंब्रा आदी परिसराचा समावेश आहे. तसेच या भागात बंदमुळे पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे, अशी माहिती महापालिकेने दिली.