शिवाजीनगरमध्ये पाच मुलांना चावा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
अंबरनाथ शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत चालली असून रविवारी येथील शिवाजीनगर भागात भटक्या कुत्र्याने पाच लहान मुलांचा चावा घेतल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. या घटनेत दोन ते पाच वर्षांच्या मुलांचा समावेश असून या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शिवाजीनगर भागात दोन दिवसांपासून एका भटक्या कुत्र्याने दहशत निर्माण केली होती. रविवारी येथील गणपती मंदिराजवळ काव्या इरमाळे ही दोन वर्षांची चिमुरडी आपल्या छोटय़ा दोस्तांसमवेत खेळत होती. तेव्हाच या भटक्या कुत्र्याने तिच्या पायाला व हाताला चावा घेऊन लचका तोडला. या कुत्र्याने या वेळी इतरही लहान मुलांनाही चावा घेतला. मुलांच्या पालकांनी मुलांना तातडीने अंबरनाथ पालिकेच्या छाया रुग्णालयात रेबिज होऊ नये यासाठीचे इंजेक्शन देण्यासाठी धाव घेतली. मात्र, पालिका रुग्णालयात इंजेक्शन उपलब्ध नसल्याने या पालकांना मुलांना घेऊन तात्काळ बदलापूर ग्रामीण रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागले.
हा कुत्रा यापूर्वी याच परिसरातील प्राजक्ता गायकर (६) या मुलीच्या डोक्यालाही चावला असून तिच्यासह रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या तीन ते चार जणांना या कुत्र्याने चावा घेतल्याचे येथील नागरिक सचिन गुडेकर यांनी सांगितले. गेल्या वर्षभरात अंबरनाथमध्ये भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला असून तीन हजारांहून अधिक जणांना कुत्रा चावल्याचे पालिकेच्या छाया रुग्णालयातील आकडेवारीवरून समोर आले आहे. त्यामुळे पालिकेने निर्बीजीकरणाची मोहीम खासगी कंत्राटदारामार्फत चालवली असली तरी पालिकेची ही निर्बीजीकरण मोहीम निव्वळ फार्स असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी या घटनेनंतर पालिकेवर संताप व्यक्त केला आहे.