गर्दीच्या वेळी शाळा परिसरात वाहतूक सेवक नेमण्याचे आदेश

शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत शाळा परिसरात होणारी वाहतूक कोंडी व त्याचा संपूर्ण वाहतूक व्यवस्थेवर होणारा परिणाम पाहून ठाणे वाहतूक पोलिसांनी आता या वाहतुकीच्या नियोजनाची जबाबदारी शाळांवर सोपवली आहे. शाळांनी आपल्या परिसरात प्रत्येक दहा मीटरसाठी एक वाहतूक सेवक नेमण्याची अधिसूचना पोलिसांनी काढली आहे. प्रत्येक शाळांनी वाहने पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करून या वाहनांना शाळेच्या आवारात पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच ज्या शाळांकडे पार्किंग व्यवस्था नसेल, त्यांनी शहरातील रस्त्यांवरील एकापेक्षा अधिक मार्गिका अडवू नयेत, अशी अधिसूचना वाहतूक पोलिसांकडून काढण्यात आली आहे.

ठाणे शहरामध्ये अनेक शाळा व शैक्षणिक संस्था असून त्यात लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बहुतेक शाळा सकाळ व दुपार अशा दोन सत्रामध्ये भरत असून अनेक वर्गाची शाळा भरण्याची व सुटण्याची वेळ एकच असल्याने शाळेच्या तसेच आजूबाजूच्या परिसरात प्रचंड वाहतूककोंडी होते. अशावेळी या रस्त्यांवरून नागरिकांना धड चालणेही मुश्कील होते. त्यामुळे शाळेच्या परिसरातील वाहतुकीला शिस्त लावण्याच्या हेतूने ही अधिसूचना काढण्यात आली आहे. पुढील सहा महिन्यांसाठी ही अधिसूचना लागू राहणार असून याविषयी काही सूचना असल्यास पोलीस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण कक्षाच्या तीन हात नाका येथील कार्यालयात कळवाव्यात, अशी माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.

शाळांना सूचना

* शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी शाळेच्या परिसरातील वाहतूक शिस्तबद्ध ठेवण्यासाठी शाळेने प्रति दहा मीटर अंतरासाठी एक वाहतूक सेवक नियुक्त करावा.

* ज्या शाळांची वाहन पार्किंगची स्वत:ची व्यवस्था आहे, त्यांनी त्यांच्या स्कूल बसेस व व्हॅन रस्त्यावर उभ्या करण्याऐवजी शाळेच्या आवारात उभ्या करून तिथे विद्यार्थ्यांची चढ-उतार करावी.

* विद्यार्थ्यांची शाळेत ने-आण करणाऱ्या पालकांची खासगी वाहनेही शाळेच्या आवारातच उभी करावीत.

* ज्या शाळांची स्वत:ची पार्किंग व्यवस्था नाही, त्यांनी विद्यार्थी ने-आण करणाऱ्या वाहनांसाठी रस्त्याची केवळ एकच मार्गिका वापरावी.