सध्या पुरस्कार हा चर्चेचा विषय झालेला आहे. पुरस्कारातही एक राजकारण असते. एका कार्यक्रमात पुरस्कार द्यायचा दुसऱ्या कार्यक्रमात काढून घ्यायचा, असे राजकारण रंगलेले आपण अनेकदा पाहतो. चतुरंगचा पुरस्कार वेगळ्या पद्धतीचा लोकपुरस्कार आहे. राजकारण किंवा समाजकारणाची एकारलेपणाची दृष्टी न ठेवता लोकवर्गणीतूनच हा पुरस्कार दिला जातो. गेल्या २५ वर्षांत चतुरंगने जे संचित जमा केले आहे ते पाहता त्यांनाच साहित्य अकादमीच्या वतीने पुरस्कार दिला पाहिजे, असे प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी येथे केले.

चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने रौप्यमहोत्सवी रंगसमेलनाचे आयोजन महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आयोजित केले आहे. या संमेलनाचा रौप्यमहोत्सवी आनंद सोहळा डोंबिवलीतील स. वा. जोशी शाळेच्या पटांगणात शनिवारी रात्री पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विनय सहस्रबुद्धे बोलत होते. सहस्रबुद्धे यांच्या हस्ते दहा जनसेवकांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. यात मेजर गावंड, ठाणे (सैनिकी प्रशिक्षण), सदानंद ऊर्फ नंदकुमार काटदरे, वहाळ (शाळा निर्माण), सुनीता पाटील, नाशिक (बेवारस प्रेतांचे अंत्यसंस्कार), राहुल देशमुख, पुणे (अंधांसाठी कार्य), प्रतिभा चितळे, पुणे (नर्मदा परिक्रमावासीयांची सेवा), कांचन सोनटक्के, विलेपार्ले (मतिमंद मुलांसाठी नाटय़शिक्षण), चारुदत्त सरपोतदार, पुणे (दुर्लक्षित कलावंतांना आधार), विजय जाधव, ठाणे (विस्थापित बालकांचे पुनर्वसन), इरफाना मुजावर, कांदिवली (वेश्यांच्या मुलांचे पुनर्वसन), डॉ. ममता लाला, अंधेरी (एच. आय. व्ही.ग्रस्त बालकांना साहाय्य) यांचा समावेश होता. याप्रसंगी दा. कृ. सोमण, या वर्षीचे जीवनगौरव पुरस्कार विजेते गिरीश प्रभुणे, डॉ. प्रसाद देवधर आदी मान्यवर उपस्थित होते.

चळवळीची संस्था व्हावी

सहस्रबुद्धे पुढे म्हणाले, समाजाचे सांस्कृतिकीकरण करण्यात चतुरंगची मोलाची कामगिरी आहे. त्यांची इतरांशी तुलना होऊ शकणार नाही. सांस्कृतिक जाणीव असणाऱ्या सामाजिकीकरणाचे केंद्रीकरण या संस्थेला जमले आहे. या चळवळीला त्यांनी संस्था बांधणीचे रूप देण्याचा विचार करावा. समाजकार्य करण्याची ऊर्मी व ऊर्जा एकांगीपणातून अधिक प्रभावी होते. तिला संस्थात्मक चौकटीत दरवेळी बांधून ठेवण्याची गरज नसते हे चतुरंगच्या कार्याचे फलित आहे. समाज हा माझा आहे त्याचे दायित्व स्वीकारले आहे या जाणिवेतून हे काम आक्रसले जाणार नाही याची जबाबदारी ठेवावी, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला.

प्रसाद देवधर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सांगितली तर चतुरंगचे संस्थापक विद्याधर निमकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. विघ्नेश जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.