महावितरणच्या सर्व वीज ग्राहकांनी महावितरणच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून किंवा महावितरणच्या अ‍ॅपवरून वीज देयक भरणा करावा, यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘महावितरण आले दारी’ या उपक्रमांतर्गत वीज ग्राहकांना या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता श्रीकांत जलतारे यांनी केले आहे.
महावितरण कार्यालयात, महावितरणच्या किंवा खासगी वीज देयक भरणा केंद्रावर न जाता, वीज ग्राहकांना घर, कार्यालयात बसून वीज देयक भरता यावे यासाठी महावितरणने अत्याधुनिक प्रणाली विकसित केली आहे. महावितरणने स्वत:चे एक अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक वीज खंडित झाल्याची तक्रार करू शकतो, थकबाकी, देयक भरण्याची अंतिम तारीख विचारू शकतो, असे अधीक्षक अभियंता किशोर परदेशी यांनी सांगितले. ग्राहकांना कोठेही रांगेत ताटकळ उभे राहण्यास लागू नये, म्हणून महावितरणने हे पर्याय दिले आहेत.