वारंवार बंद पडत असल्याने रेल्वे प्रवाशांची गैरसोय
मध्य रेल्वेच्या ठाणे, कल्याण आणि डोंबिवली स्थानकात सुरू करण्यात आलेले सरकते जिने वारंवार बंद पडू लागल्याने या जिन्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका सहन करावा लागत आहे. गर्दीच्या काळात सरकत्या जिन्यावरून प्रवास करत असताना अचानकपणे या जिन्यांचे सरकणेच बंद होते. काही वेळा संपूर्ण दिवसभर हे जिने बंद असल्याची तक्रार प्रवासी करू लागले आहेत. या जिन्यांची देखभाल-दुरुस्ती आणि तेथे लक्ष ठेवण्यासाठी या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असली तरी अनेकदा या भागात कोणत्याही प्रकारचे कर्मचारीच उपलब्ध नसल्याचे दिसून येते. त्यामुळे सरकत्या जिन्यांच्या नव्याची नवलाई संपली असून आता रेल्वे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप प्रवासी संघटनांनी केला आहे.आंतरराष्ट्रीय दर्जाची स्थानके होण्याच्या दृष्टीने ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाटांवरून पुलावर चढण्यासाठी सरकते जिने बसवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला होता. २०१३-१४ मध्ये ठाणे आणि त्यापाठोपाठ कल्याण, डोंबिवली स्थानकात प्रत्येकी दोन-दोन सरकते जिने बसवण्यात आले. सरकते जिने बसवल्यानंतर उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी हे जिने सरकण्याचे बंद झाले होते. मात्र त्यानंतर या जिन्यांच्या देखभालीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
पूर्वी रेल्वे फलाट आणि पूल यांवर प्रत्येक एक कर्मचारी उभे राहून प्रवाशांना मार्गदर्शन करीत होते. आता ते बेपत्ता झाले आहेत, तसेच रात्री दहानंतर ही सुविधा बंद करण्यात येते. गेल्या काही दिवसांपासून या सुविधेमध्ये अनेक विघ्न येण्यास सुरुवात झाली असून जिन्यावरून जात असताना मध्येच सेवा बंद होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.त्यामुळे लोकांना जिने चढावे लागतात. विशेष म्हणजे सरकते जिने असलेला भाग अत्यंत अरुंद असल्याने या भागातून चालत जाणे प्रवाशांसाठी अडचणीत भर टाकणारेच आहे. या प्रकरणी रेल्वेच्या जनसंपर्क विभागास संपर्क साधला असता रेल्वेने या सुविधेकडे पुरेसे लक्ष असून अनेक प्रवाशांच्या चुकांमुळेही हे जिने बंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. जिन्याच्या वरील आणि खालील बाजूला असलेले बटण दाबले गेल्याने जिने बंद होत असतात. मात्र ते तात्काळ सुरू करण्यात येत असल्याचे जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले. सध्या दिवसातून एक ते दोन तास तर कधी कधी पूर्ण दिवससुद्धा सरकते जिने बंद असल्याचे दिसून येते. रेल्वे प्रशासन देखभाल-दुरुस्तीच्या कामांची कारणे सांगत असली तरी त्यावर पूर्णपणे इलाज मात्र केला जात नाही. – नंदकुमार देशमुख, रेल्वे प्रवासी महासंघ

सरकते जिने बसवल्यामुळे पुलावर चढण्यासाठीची जागा अत्यंत अरुंद झाली असून त्यामुळे जिन्यावर अनेक वेळा ढकलाढकली होते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
 – अश्विन पाटील, प्रवासी