डोंबिवलीतील मानपाडा रस्त्यावर पांडुरंगवाडी येथे बुधवारी सायंकाळी एका मद्यपी तरुणाने भरधाव वेगाने चालवलेल्या गाडीच्या धडकेत ७० वर्षीय महिला जबर जखमी झाली. या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून मयूर नंदू चौगुले (२१) असे त्याचे नाव आहे. भिवंडीचे भाजप आमदार महेश चौगुले यांचा तो पुतण्या आहे. महिलेला स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मयूर चौगुले हा मद्यपान करून पांडुरंगवाडी येथून मारुती अर्टिगा या गाडीने जात होता. त्याचवेळी तेथून निर्मलाबाई कुलकर्णी (७०) या रस्त्याच्या बाजूने जात होत्या. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या मयूरला वाहनावर नियंत्रण राखता न आल्याने त्याने निर्मलाबाईंना धडक दिली. त्यात निर्मलाबाई जखमी झाल्या. मयूरने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. भाजप नेत्याचा नातेवाईक असल्याचे सांगत त्याने स्थानिकांना धमकावण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी त्याला टिळकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.