कर्मचाऱ्यांचीही चौकशी; लवकरच गुन्ह्यची उकल करण्याचा पोलिसांचा विश्वास

ठाण्यातील चेकमेट सव्‍‌र्हिस या खासगी वित्त कंपनीतील दरोडय़ाप्रकरणी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू असून, दरोडय़ाचा उलगडा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

ठाणे येथील तीन हातनाका भागातील हरदीप इमारतीमध्ये असलेल्या चेकमेट सव्‍‌र्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये मंगळवारी पहाटे दरोडा पडला. या कंपनीतून पाच कोटी रुपये दरोडेखोरांनी लुटून नेल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले होते.

मंगळवारी रात्री उशिरापर्यंत कंपनीतून किती रोकड लुटून नेण्यात आली, याची माहिती पोलीस घेत होते. त्यामध्ये कंपनीतून नऊ कोटी १६ लाख रुपयांची लूट झाल्याचे उघड झाले आहे.

याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दरोडेखोरांच्या शोधासाठी ठाणे पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. त्यामध्ये स्थानिक पोलिसांसह गुन्हे अन्वेषण शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून दरोडेखोरांनी कंपनीतून सीसीटीव्ही कॅमेरे चोरून नेले आहेत. दरोडय़ाप्रकरणी पोलिसांनी कंपनीतील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली असून त्यातून काही धागेदोरे मिळतात का, याची चाचपणी पोलीस करीत होते. याशिवाय, पोलिसांची काही पथके आरोपींचा माग काढीत होती.

दरम्यान बुधवारी रात्री उशिरा ठाणे खंडणीविरोधी पथकाने एका ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे गुन्हय़ात वापरलेली एक गाडी सापडली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट

कंपनी इमारतीच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दरोडेखोर पसे घेऊन पळताना दिसत आहेत.मात्र, घटनेच्या वेळी पाऊस पडत असल्याने फुटेजमधील चित्र धुरकट दिसत असल्यामुळे दरोडेखोरांची ओळख पटविण्यात अडचण निर्माण झाली आहे.