कल्याण पश्चिमेकडील घटना
कल्याण पश्चिमेकडील एका चाळीमध्ये घरगुती गॅस सिलिंडरमधून गळती होऊन झालेल्या स्फोटात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला, तर ११ जण जखमी झाले. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास झालेल्या या स्फोटामुळे घराची भिंत कोसळून शेजारील घरात राहणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला. जखमींपैकी दहा जणांना उपचारासाठी मुंबईच्या शीव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागात कार्यरत असलेले रवींद्र गायकवाड यांचे कल्याण पश्चिमेतील रमाबाई आंबेडकरनगरमध्ये एक मजली घर आहे. या घरातील तळमजल्यावरील खोली त्यांनी सलीम शेख कुटुंबाला भाडय़ाने दिली आहे. सकाळी साडेसहाच्या सुमारास शेख यांच्या घरात सिलिंडरमधून
गॅस गळती होऊन स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता खूप जास्त असल्याने बाजूला राहणारे धनगर आणि आवारे यांच्या घराच्या भिंतींची पडझड झाली तसेच इतरांच्या घरांच्या काचा फुटल्या. भिंत कोसळल्याने धनगर यांच्या घरात पाहुण्या म्हणून आलेल्या ताराबाई गायकवाड (७०) यांचा डोक्याला मार लागून मृत्यू झाला. या घटनेत एकूण ११ जण जखमी झाले. त्यापैकी बिभिषण आवारे यांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांच्यावर रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार करण्यात आले, तर अन्य जखमींवर शीव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गळती रात्रभर सुरू होती. त्याचा अंदाज न आल्याने शेख यांच्या घरातील महिलेने सकाळी विजेचे बटण दाबताच गॅसचा स्फोट झाला, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका मागविण्यात आल्या. मात्र रुग्णवाहिका न आल्याने अखेर पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या गाडीतूनच जखमींना पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले. मात्र पुरेशी सुविधा नसल्यामुळे जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पाहुणीवर काळाची झडप
सिलिंडरचा स्फोट झालेल्या घराच्या शेजारीच अलका धनगर यांचे घर आहे. अलका यांची आई ताराबाई (७०) या काही दिवस मुलाकडे तर काही दिवस त्यांच्याकडे राहात होत्या. काही दिवसांपूर्वीच त्या अलका यांच्याकडे राहण्यासाठी आल्या होत्या. शेख यांच्या घरात झालेल्या गॅस स्फोटामुळे घराच्या भिंतींची पडझड झाली. यात ताराबाई यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

जखमींची नावे
अलका धनगर,ज्योत्स्ना धनगर, केतन धनगर, सलीम सय्यद शेख, शबाना सलीम सय्यद शेख, रेहान सुभान शेख, आरफीया शेख, बिभिषण आवारे, भाग्यश्री आवारे, धनश्री आवारे, कीर्ती आवारे