आर्य गुरुकुल शाळा सिलिंडर स्फोट प्रकरण

शाळेच्या आवारात फुगेवाल्याकडून फुगे घेत असताना अचानक झालेल्या स्फोटात भाजलेल्या पाच विद्यार्थ्यांपैकी एकाला आपली दृष्टी गमवावी लागली आहे. या स्फोटात गंभीररीत्या भाजलेल्या पाच मुलांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हलविण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु नवीन पाटील याला आपली दृष्टी गमवावी लागली. इतरांची प्रकृती सुधारत असून दोन-तीन दिवसांत त्यांना घरी सोडण्यात येईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

कल्याण (पूर्व) येथील आर्य गुरुकुल शाळेच्या आवारात फुगेवाल्याकडील सिलिंडरचा स्फोट होऊन फुगेवाल्याचा जागीच मृत्यू झाला, तर पाच विद्यार्थी आणि सात पालक गंभीर भाजले होते. या पाच विद्यार्थ्यांना डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सिलिंडरच्या टाकीतील विषारी गॅस डोळ्यांत गेल्याने आणि चेहऱ्यावर उडाल्यामुळे त्यांचे चेहरे भाजले होते. तसेच, डोळ्यांनाही इजा झाली होती.

गंभीर भाजलेल्या या मुलांच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करावी लागणार असल्याने त्यासाठी निष्णात बालरोगतज्ज्ञ, नेत्रविशारद, प्लास्टिक सर्जरीतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ अशा सर्व डॉक्टरांचे एकत्रित पथक लागणार होते. ही सोय डोंबिवलीत नसल्याने त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉ. अनघा हेरुर यांनी दिला होता.

त्यानुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हिंदुजा रुग्णालयाशी संपर्क साधून श्रीयांशू पांडे (४), नवीन पाटील (५), कौशल्या पवार (४) अभिराज चौधरी (४) व लोकेश महाजन (५) या पाच विद्यार्थ्यांना उपचारासाठी तिथे हलविले होते.

‘गंभीर दुखापतीमुळे डोळे वाचविणे अशक्य’

गेले काही दिवस या बालकांवर हिंदुजामध्ये उपचार सुरू होते. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया पार पडल्या असून यातील नवीनची दृष्टी गेली आहे, तर इतर चौघांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. नवीन याच्या डोळ्यास गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचे डोळे वाचविता आले नाहीत. मात्र याविषयी डॉक्टर काही बोलण्यास तयार नाहीत. बालरोगतज्ज्ञडॉ. गिरीश भिरुड यांनी हे वृत्त खरे असल्याचे सांगत, इतर चार मुलांच्या डोळ्यांना कोणताही धोका नसून दोन-तीन दिवसात त्यांना घरी पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. डॉ. तात्याराव लहाने यांनीही या बालकांची भेट घेऊन चौकशी केली होती.