पर्यावरण नियमांचे उल्लंघन अंगलट येण्याच्या भीतीने पालिकेचेच कृत्य?

कोपरी येथील खाडीकिनारी भागात चक्क कांदळवनावर भराव टाकून ठाणे महापालिकेनेच खुली व्यायामशाळा उभारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पालिकेकडून पर्यावरण नियमांचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारी पुढे येताच प्रकरण अंगलट येऊ नये यासाठी ही व्यायामशाळाच ‘गायब’ करण्यात आल्याचा आरोप ठाण्यातील पर्यावरणप्रेमींनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

याच भागात असलेल्या एका उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी दोन वर्षांपूर्वी दहा लाखांचा आमदार निधी मंजूर करण्यात आला होता. स्थानिक आमदार म्हणून पालकमंत्री एकनाथ िशदे यांची या कामासाठी शिफारस होती. मात्र हा निधी उद्यानाच्या सुशोभीकरणाऐवजी कांदळवनात व्यायामशाळा उभारण्यासाठी खर्च करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी केला आहे. आमदार निधीचे हे गौडबंगाल कायम असताना नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेने याच उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी पुन्हा एकदा ५५ लाखांचा निधी मंजूर केल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणी मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करीत या प्रकरणी मुख्यमंत्री आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करण्याची मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

या प्रकरणी महापालिकेतील बांधकाम विभागाशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही होऊ शकला नाही. आयुक्त संजीव जयस्वाल यांना तक्रारीची प्रत व्हॉटस्अ‍ॅप करून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या प्रकरणी माहिती घ्यावी लागेल असे सांगितले. पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही तर सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी मोबाइल संदेशाला उत्तर दिले नाही.

कांदळवनात महापालिकेचा रस्ता

या ठिकाणी तयार करण्यात आलेला रस्ताही कांदळवनावर भराव टाकून करण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. मात्र हा रस्ता आम्ही बांधलाच नसल्याचा दावा पालिका करीत आहे. उद्यानाच्या निधीचा आधीच गैरवापर झाला असतानाच आता महापालिकेने पुन्हा याच उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी ५५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा संशय जोशी यांनी व्यक्त केला. या प्रकरणामुळे आमदार निधीचा कशा प्रकारे गैरवापर होतो आणि नागरिकांच्या पैशांचा कशा प्रकारे चुराडा केला जातो, याचे वास्तव पुढे आले आहे. एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे. त्यामुळे या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करावी, अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानाचे पदाधिकारी संजीव साने यांनी केली आहे.

प्रकरण काय?

  • कोपरी येथील मीठबंदर भागातील खाडीकिनाऱ्याजवळ अण्णा भाऊ साठे उद्यान आहे. दोन वर्षांपूर्वी हे उद्यान विकसित करण्याची शिफारस करीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ लाख ९२ हजार रुपये इतका आमदार निधी देऊ केला.
  • या निधीतून उद्यानात पदपथ, थीम पेंटिंग तयार करणे तसेच प्रवेशद्वार, आकर्षक विद्युत दिवे, बाके बसविण्यासारखी कामे केली जाणे अपेक्षित होते.
  • कोपरीकरांसाठी एक सुसज्ज उद्यान उभे राहावे असा या कामामागील मूळ उद्देश होता. प्रत्यक्षात या ठिकाणी ठरल्यानुसार एकही काम करण्यात आलेले नाही.
  • उद्यानाऐवजी लगतच असलेल्या कांदळवनाच्या भागात या निधीतून खुली व्यायामशाळा उभारण्यात आल्याचा आरोप पर्यावरण अभ्यासक रोहित जोशी यांनी केला.
  • कांदळवन क्षेत्रात असे बांधकाम करता येत नाही. त्यामुळे या प्रकरणी पर्यावरणप्रेमींनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या. हे प्रकरण अंगलट येत आहे हे लक्षात येताच खुल्या व्यायामशाळेचे साहित्य रातोरात उखडून तेथून हलविण्यात आल्याचा आरोपही या वेळी तक्रारदारांनी केला.