कल्याण, डोंबिवलीतून बाहेर पडणारे वाहन चालक आपली वाहने वाहतूक कोंडीचा अडथळा टाळण्यासाठी पत्रीपूल ते ठाकुर्ली वळण रस्त्यावरून थेट सावित्रीबाई फुले रस्त्यावरील चौकाने प्रवास करीत आहेत. या प्रवासामुळे पिसवली, टाटा नाका चौक, शिळफाटा रस्त्यावरील कल्याण डोंबिवलीत ये-जा करणाऱ्या वाहनांची वर्दळ कमी झाली आहे.
या नवीन ‘काटकोनी’ रस्त्यांमुळे कल्याण डोंबिवली हे अंतर अवघ्या आठ ते दहा मिनिटात कापणे शक्य झाले आहे. कचोरे, ठाकुर्ली, चोळे भागात नवीन गृहसंकुले उभा राहिली आहेत. या संकुलांच्या दोन्ही बाजुने हा रस्ता गेला आहे. या रस्त्यावरून यापूर्वी ये-जा करणे अवघड होते. रात्रीच्या वेळेत साप, विंचू या रस्त्यावर असल्याने संध्याकाळी सात नंतर या रस्त्यावरून जाणे या भागातील रहिवाशांच्या जीवावर येत असे. या भागात गृहसंकुल उभी राहिली आणि कचोरे, ठाकुर्ली, चोळे परिसराचा पूर्ण कायापालट झाला आहे.
डोंबिवलीत जाण्यासाठी यापूर्वी वाहन चालकांना पत्रीपूल, टाटा नाका, सावित्रीबाई फुले नाटय़ मंदिरमार्गे किंवा नंदी हॉटेलमार्गे जावे लागत होते. या प्रवासासाठी वाहन चालकांना काही वेळा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. हा प्रवास २० ते २५ मिनिटांचा होता. असाच वेळ डोंबिवलीतून कल्याणला जाण्यासाठी लागत होता. नवीन पत्रीपूल-ठाकुर्ली ते सावित्रीबाई फुले नाटय़मंदिर या काटकोनी रस्त्यामुळे हे अंतर दहा मिनिटांनी कमी झाले आहे. बहुतेक वाहन चालक पत्रीपुलाकडून कचोरे रस्ता, ठाकुर्ली येथून सावित्रीबाई फुले रंगमंदिर या ठिकाणी निघायला जातात. तेथून डोंबिवलीत प्रवेश करतात.
९० फुटी हा नवीन रस्ता द्रृतगती महामार्गासारखा पालिकेने बांधला आहे. चार मार्गिकांमध्ये या रस्त्याची बांधणी करण्यात आली आहे. ठाकुर्ली जवळ या रस्त्याला वळण आहे. हा वळण रस्ता थेट सावित्रीबाई फुले नाटय़मंदिर येथे निघण्यास जातो. कल्याण डोंबिवली शहरातील एकमेव देखणा रस्ता म्हणून या रस्त्याची चर्चा सुरू आहे.
या रस्त्याने डोंबिवलीत येणारे वाहन चालक ठाकुर्ली, चोळे गावातून रेल्वे फाटक, जलाराम मंदिर, जोशी शाळा, गणेश मंदिरावरून नेहरू रस्त्याने फडके रस्त्याने थेट पालिकेच्या डोंबिवली कार्यालयाजवळ निघण्यास येतात. डोंबिवलीतील काही वाहन चालक आणखी मधला मार्ग म्हणून ब्राह्मण सभा, मुखर्जी रस्ता, पेंडसेनगर, महिला समिती शाळेसमोरून हनुमान मंदिरावरून मुख्य रस्त्याच्या दिशेने येतात. कल्याणकडे जाणारी डोंबिवलीतील बहुतेक वाहने या पर्यायी रस्त्यांचा वापर करीत असल्याने येत्या काळात डोंबिवलीतील वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी होणार असल्याची चर्चा आहे.

पत्रीपूल ते कचोरे रस्त्याची मागणी
नवीन रस्त्याप्रमाणे पत्रीपूल ते कचोरे गावाजवळील रखडलेला रस्ता प्राधान्याने पूर्ण करण्यात यावा अशी, नागरिकांची मागणी आहे.