ध्वनिप्रदूषणाबाबतच्या नियमांचे बहुतांश आयोजकांकडून पालन

ध्वनिप्रदूषणासंबंधी न्यायालयाने आखून दिलेल्या नियमांचा ठाणे, डोंबिवलीतील नववर्ष स्वागतयात्रेच्या आयोजकांनी काही प्रमाणात धसका घेतल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. दरवर्षी ढोल-ताशाच्या आवाजाने डोंबिवली शहर दणाणून सोडणाऱ्या ढोल-ताशा पथकांचा आवाज या नियमामुळे यंदा नरमल्याचे चित्र दिसून आले तर ठाण्यातही पोलिसांकडून चौकाचौकात आवाजाची पातळी तपासली जात होती. दरम्यान, या मुद्दय़ाचे राजकारण करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विष्णूनगर आणि घंटाळी चौकात ढोल-ताशांचे गजर केला खरा, मात्र नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी आयोजकांवर येत्या काही दिवसांत गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

[jwplayer gLyhqAeU-1o30kmL6]

मुंबई उच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषणाच्या मुद्दय़ावर ठाणे पोलिसांना फटकारले असल्यामुळे, यंदा गुढीपाडव्याच्या स्वागतयात्रांमध्ये होणाऱ्या ढोलताशांच्या दणदणाटाबद्दल पोलिसांनी कडक भूमिका घेतली होती. ठाणे शहरात गुढीपाडव्यानिमित्ताने निघणाऱ्या स्वागतयात्रेमध्ये ढोल पथकांमुळे ध्वनिप्रदूषण झाले तर संबंधित आयोजकांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला होता. कारवाईच्या धसक्यामुळे ढोल पथकांना सहभागी करून घ्यायचे नाही, अशी भूमिका आयोजकांनी घेतल्यानंतर ढोल पथकांनीही स्वागत यात्रेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात मंगळवारी सकाळी गुढीपाडव्यानिमित्ताने निघालेल्या स्वागतयात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी तसेच शांतता क्षेत्रांत पोलीस ध्वनिमापक यंत्राद्वारे आवाजाची पातळी मोजत होते. ठाण्यातील स्वागतयात्रेमध्ये ढोल पथके सहभागी झाली नव्हती. मात्र, ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे स्वागतयात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी तसेच शांतता क्षेत्रामध्ये ध्वनिक्षेपकाद्वारे होणाऱ्या आवाजावरही पोलीस लक्ष ठेवून होते.  स्वागतयात्रेमध्ये आयोजकांकडून घालण्यात आलेल्या बंदीमुळे ढोलपथकांनी बहिष्कार टाकला होता. मात्र, विष्णूनगर आणि घंटाळी या दोन चौकांमध्ये मनसेचे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी ढोलपथके आणून दणदणाट केला. या संदर्भात ठाणे शहराचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्याशी संपर्क साधला असता, स्वागतयात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी व शांतता क्षेत्रामध्ये आवाजाची पातळी मोजली आहे. याशिवाय, नौपाडा भागात वाजविण्यात आलेल्या ढोलच्या आवाजाची पातळी मोजण्यात आली आहे. त्यामध्ये ध्वनिप्रदूषण केल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

डोंबिवलीतही आवाज खाली

यंदा डोंबिवलीत आयोजकांनी ढोल वादकांची संख्या कमी केल्याने काही ढोलताशा पथक हे चौकात उभे न राहता यात्रेत सहभागी झाले होते. ढोलपथकांनी नियमांचे उल्लंघन करू नये म्हणून पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्वागतयात्रेत सहभागी होणाऱ्या ढोलपथकांना ध्वनिप्रदूषण होऊ नये म्हणून नियम समजावून सांगण्यात आले होते. पोलिसांचे गस्तीपथक स्वागतयात्रेदरम्यान या पथकांवर लक्ष ठेवून होते.

[jwplayer pqdTtL1f-1o30kmL6]