अन्य पक्षांतील वादग्रस्त नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश

कल्याण-डोंबिवली महापालिकेची सत्ता एकाहाती ताब्यात घेण्यासाठी आसुसलेल्या भाजपने उमेदवार काय पात्रतेचा असेल यापेक्षा तो साम, दाम, दंड, भेदाचा अवलंब करून निवडून कसा येईल, अशी व्यूहरचना आखल्याचे विश्वसनीय वृत्त असून अन्य पक्षांमधील गुन्ह्य़ांचे आरोप असलेल्या काही नगरसेवक, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याचा सपाटा लावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवारी डोंबिवलीत अशाच काही ‘नामवंतांना’ पावन करून घेण्याच्या हालचालींचा जोर आला आहे.

ठाणे जिल्ह्य़ाच्या बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या ताब्यात याव्यात यासाठी भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात जोरदार प्रयत्न सुरू आहेत. येथील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी या दोन्ही पक्षांतील गणंगाना गळाला लावण्याचे प्रयत्नही सुरू झाले आहेत. कल्याण डोंबिवली पालिका निवडणूक मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत: प्रतिष्ठेची केली आहे. पूर्वीचा गोंधळ रोखण्यासाठी खासदार कपिल पाटील यांच्या हाती निवडणुकीची सूत्रे प्रदेश भाजपने सोपवली आहेत. याशिवाय या भागातील सर्व आमदारांना निवडणुकीच्या बांधणीत उतरविण्यात आले आहे.

डोंबिवलीत भाजपच्या काही प्रभागांमध्ये प्रभाव आहे. कल्याण पूर्व, पश्चिम भागात जेमतेम प्रभागात भाजपचा वरचष्मा आहे. या गणितांवर पालिकेत एक हाती सत्ता मिळविणे मुश्किल होईल, याची जाणीव असलेल्या भाजपच्या नेत्यांनी अन्य पक्षांमधील तगडे उमेदवार, पदाधिकारी यांची कोणतीही पाश्र्वभूमी न तपासता अशा मंडळींना भाजपमध्ये प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या महिन्यात गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या एका नगरसेवकाला तर २७ गावांमधील एका कुख्यात समाजसेवकाला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश देण्यात आले आहेत. हे प्रवेश देताना स्थानिक नेत्यांनी या आयाराम मंडळींची पाश्र्वभूमी मुख्यमंत्र्यांपासून लपवून ठेवल्याची चर्चाही आता रंगली आहे. शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्र्या मंत्रिमंडळासह डोंबिवलीत भाजपच्या विकास परिषदेसाठी येत आहेत. त्यावेळी विविध पक्षांमधील उठवळ पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या हातात भाजपचा झेंडा देण्यात येणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. यासंबंधी पक्षाच्या स्थानिक नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही उशिरापर्यंत ठोस प्रतिक्रिया मिळू शकली नाही.