स्थलांतरित पाकिस्तानी नागरिकांच्या अर्जावर ठाण्यात सुनावणी

‘जन्मापासून आम्ही पाकिस्तानमध्ये राहत असलो तरी आता आम्हाला भारतीय म्हणून अस्तित्व हवे आहे. आमचे आयुष्य तर तिथे गेले मात्र माझ्या मुली आणि नातवंडांना भारताचे नागरिकत्व मिळावे असे वाटते. तिकडची परिस्थिती आता खुपच कठीण आहे. मी दोन वर्षांचा व्हिसा घेऊन इथे आलो आहे. आमचे आर्जव ऐका आणि माझ्या पुढील पिढीला तरी भारतीय म्हणून जगण्याचा सन्मान मिळवून द्या..माझ्या पुढच्या पिढीला तरी भारतात जन्मू द्या’. धनजी फुफ्फल आपली व्यथा जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्यापुढे पोटतिडकीने मांडत होते.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित भारतीय नागरिकत्व देण्याविषयीच्या विशेष शिबीरांमध्ये धनजी फुफ्फल यांच्यासारख्या ४४ नागरिकांनी सहभाग नोंदवून नागरिकत्व देण्याची मागणी केली. यावेळी मुळच्या पाकीस्तानी असलेल्या नागरिकांचे आर्जव ऐकून उपस्थित अक्षरश हेलावून जात होते. केंद्रीय गृह मंत्रालयाचे संचालक प्रवीण होरो सिंग यांच्या उपस्थितीत हे शिबीर पार पडले.

पाकिस्तानमधील फळणीपुर्वीच्या कराची शहरात व्यवसायाने अ‍ॅक्युप्रेशरिस्ट असलेल्या धनजी फुफ्फल यांचा जन्म झाला. वडील तेथेच व्यवसाय करायचे, मात्र धनजी यांचा ओढा भारताकडेच अधिक होता. त्यामुळेच मुंबईमध्ये येऊन त्यांनी अ‍ॅक्युप्रेशरिस्टचा अभ्यासक्रम पुर्ण केला. सध्या ते मोठय़ा मुदतीच्या व्हिसाच्या सहाय्याने भारतात राहात आहेत. मुली आणि नातवंडाना भारताचे नागरिकत्व मिळावे यासाठी त्यांचा प्रयत्न आहे.अशाच प्रकारची काहीशी कथा आणि व्यथा भारतामध्ये गेली अनेक वर्षांपासून राहणाऱ्या प्रेमचंद बखतराय मटलानी यांनी या शिबीरात व्यक्त केली.

ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकार यांनी पुढाकार घेऊन हे शिबीर भारतीय नागरिकत्व अधिनियम १९५५ अन्वये आयोजित केले होते. या शिबिरासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संचालक प्रवीण होरो सिंग उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शनही केले. बुधवारी ४३ नागरिक त्यांची प्रकरणे घेऊन आले होते. ही मंडळी गेल्या काही काळापासून उल्हासनगरच्या सिंधी कॉलनीमध्ये राहतात. या शिबीरात भारतीय नागरिकत्व मिळालेल्या नागरिकांच्या अल्पवयीन मुलांना भारतीय नागरिकत्व मिळणे, फाळणीपूर्वी पासून इतर देशात राहणारे मूळ भारतीय वंशाचे नागरिक, भारतीय नागरिकाशी विवाह झालेले आणि ७ वर्षांनंतर भारतीय नागरिकत्वासाठी नोंदणी अर्जावर मार्गदर्शन करण्यात आले.

१२ वर्षांपासूनची धडपड .

पाकिस्तानातून भारतात आलेल्या व्यक्ती सध्या येथेच वास्तव करीत असून १२ वर्षे झाल्या नंतर सुध्दा त्यांना नागरिकत्व मिळत नसल्यामुळे त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सरकारच्या नव्या धोरणामुळे येथे स्थायिक होण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याने उल्हासनगर, कल्याण, वाशी व ठाणे येथे वास्तव करणाऱ्या या नागरिकांमध्ये या शिबीरामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.