शास्त्रीय संगीताचा समृद्ध वारसा जोपासणाऱ्या पं. राम मराठे संगीत महोत्सवाचा नजराणा या वर्षी २१ नोव्हेंबरपासून संगीत रसिकांसाठी आयोजित करण्यात आला आहे. प्रख्यात तबलावादक पं. अनिंदो चटर्जी, सरोदवादक पार्थो सारथी यांच्यासह दिग्गज कलाकारांची मांदियाळी या महोत्सवाचे आकर्षण असून संगीत रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर संजय मोरे यांनी केला आहे. शनिवार २१ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत हा संगीत समारोह गडकरी रंगायतन इथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास नियोजित अ. भा. नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष व प्रसिद्ध नाटककार गंगाराम गवाणकर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल उपस्थित राहणार आहेत.
संगीत समारोहाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात रात्रौ ८.३० वाजता नूपुर काशिद-गाडगीळ (ठाणे) यांच्या गायनाने होणार आहे, तर प्रसिद्ध शास्त्रीय गायिका पद्मश्री सुमित्रा गुहा (दिल्ली) यांचे गायनही होणार आहे. २२ नोव्हेंबर रोजी ५ वाजता वाजता समीर अभ्यंकर (डोंबिवली) यांचे गायन ठेवण्यात आले आहे, तर त्यानंतर काश्मिरा त्रिवेदी (ठाणे) या भरतनाटय़म बॅले सादर करणार आहेत. प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना अर्चना संजय यांच्या कथ्थक नृत्याने दुसरे दिवस साजरा होणार आहे. या दिवशीच्या रात्रीच्या सत्रामध्ये प्रसिद्ध व्हायोलिनवादक मिलिंद रायकर (मुंबई) आणि या सत्राचा समारोप प्रसिद्ध गायक पं. राम देशपांडे (मुंबई) यांच्या गायनाने होणार आहे.
सोमवार २३ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता प्रसन्न गुडी (बेंगलोर) यांच्या गायनाने रात्रीच्या सत्राची सुरुवात होणार आहे. तर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक पं. अनिंदो चटर्जी (कोलकता) यांच्या तबलावादनाने या सत्राचा समारोप होणार आहे. त्यांना साथ करणार आहेत त्यांचे पुत्र आणि प्रसिद्ध तबलावादक अनुब्रत चटर्जी. मंगळवार २४ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता स्व. भालचंद्र तथा अण्णा पेंढारकर यांना समर्पित संवाद निर्मित ‘सप्तसूर झंकारीत बोले’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.