महापालिकेच्या नव्या धोरणात दरांचे सुसूत्रीकरण; अद्ययावत वाहनतळ उपलब्ध होणार

कल्याण- डोंबिवली महापालिका हद्दीत येणाऱ्या नऊ रेल्वे स्थानकांलगत दररोज लाखोंच्या संख्येने वाहने घेऊन येणाऱ्यांना अद्ययावत वाहनतळांची सुविधा पुरविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय  महापालिकेने घेतला आहे. उपलब्ध खासगी वाहनतळांच्या तुलनेत पार्किंगचे दर मात्र काहीसे जास्त ठेवण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी आखलेल्या नव्या प्रस्तावानुसार स्कायवॉकतसेच महापालिका आणि खासगीरीत्या बांधण्यात येणाऱ्या पे अ‍ॅण्ड पार्क क्षेत्रात यापुढे दुचाकींना दोन तासांसाठी दहा रुपये, तर चारचाकींसाठी २५ रुपयांचा दर आकारण्याचे निश्चित करण्यात आले आहे.  याच भागात काही खासगी वाहनतळांचे दर याहून कमी असले तरी त्यांनाही हेच दर आकारण्याची सक्ती केली जाऊ शकते.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात झपाटय़ाने वाढणारी लोकसंख्या आणि वेगाने वाढणारी वाहनसंख्या लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने सविस्तर पार्किंग धोरण आखले असून यानिमित्ताने शहरात होणाऱ्या अस्ताव्यस्त पार्किंगला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महापालिका क्षेत्रात मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण, डोंबिवली, आंबिवली, टिटवाळा, विठ्ठलवाडी, ठाकुर्ली, शहाड, कोपर, निळजे ही नऊ स्थानके येतात. या स्थानकांमधून दररोज मुंबई, ठाण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या काही लाखांच्या घरात आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढत असून घरापासून रेल्वे स्थानकापर्यंत खासगी वाहनांनी येणाऱ्या प्रवाशांचा आकडा तर झपाटय़ाने वाढू लागला आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक आणि पार्किंगचे नियोजन करण्यासाठी महापालिकेने रेल्वे स्थानकापासून २०० मीटर त्रिज्यांमधील रस्ते तसेच २०० ते १५०० मीटर त्रिज्येमधील रस्त्यांचे ‘अ’ आणि ‘ब’ वर्गात वर्गीकरण करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार येथील वाहनतळ क्षेत्रांची निश्चिती केली जात आहे.

स्कायवॉकखाली ‘पे अ‍ॅण्ड पार्क’

रेल्वे स्थानक परिसरात २०० मीटर अंतराच्या पुढील रस्त्याची एक मार्गिका फेरीवाले आणि पादचाऱ्यांसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून उर्वरित रस्त्यावर फेरीवाल्यांना मज्जाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे करत असताना या क्षेत्रात स्कायवॉकखाली दुचाकी तसेच चारचाकी वाहनांसाठी ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेत असताना दुचाकी वाहनांसाठी दोन तासांसाठी १० रुपये, तर २४ तासांसाठी ४० रुपयांची दर आकारणी करण्यात येणार आहे. चारचाकी वाहनांसाठी हाच दर २५ रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत ठेवण्यात आला असून याच भागात सद्य:स्थितीत असलेल्या खासगी वाहनतळांच्या तुलनेत हे दर अधिक असल्याचे चित्र आहे. सद्य:स्थितीत या भागातील खासगी वाहनतळांमध्ये चार तासांसाठी १० रुपयांची आकारणी केली जात आहे. मात्र, महापालिकेच्या नव्या धोरणानुसार यामध्येही सुधारणा करण्याची सक्ती केली जाणार असून या संपूर्ण पट्टय़ात पार्किंगच्या दरांचे सुसूत्रीकरण असेल, असा दावा महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.

दुचाकी  “१०-४०

चारचाकी  “२५-१५०