अतिक्रमणे हटवण्याची कारवाई सुरू असतानाच बेकायदा बांधकामेही सुरूच

मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या पारसिक बोगद्याला निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन त्यावरील अतिक्रमणे हटवण्यात आली असली तरी बोगद्याला लागून असलेली बांधकामे कायम आहेत. उलट या भागात गेल्या काही दिवसांपासून जोरात बेकायदा बांधकामे सुरू असून काही इमारतींचे मजलेही वाढवण्यात येत आहेत. या परिसरातील नागरिकांकडून रुळांवर कचरा टाकण्याचे प्रकारही सुरूच आहेत. त्यामुळे हा रेल्वेमार्ग अजूनही असुरक्षित ठरत आहे.

सुमारे महिनाभरापूर्वी ठाणे महापालिका, रेल्वे आणि वनविभागाच्या पथकांनी संयुक्त कारवाई करत बोगद्याच्या मुंब्रा आणि कळवा या दोन्ही दिशांकडील ८५ झोपडय़ा जमीनदोस्त केल्या; परंतु बोगद्याला लागून असलेल्या इमारती व झोपडय़ांवर अजिबात कारवाई झालेली नाही.

मुंब््याच्या दिशने बोगद्याला लागूनच नऊ इमारती बांधण्यात आल्या आहेत. या इमारतींचे बांधकाम सुमार दर्जाचे असल्याचे पाहताक्षणी जाणवते. येथील दोन इमारतींवर काही दिवसांपूर्वी बेकायदा मजले चढवण्याचे कामही करण्यात आले आहे. मात्र, याकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

अशाच प्रकारे कळव्याच्या दिशेने असलेल्या भागातील झोपडय़ांतून रुळांवर कचरा फेकण्याचे प्रकार सुरू आहेत. दाटीवाटीने उभ्या असलेल्या या झोपडय़ांच्या भागातून घंटागाडी नेणेही शक्य नाही. त्यामुळे येथील रहिवासी कचरा थेट रुळांवर फेकतात. परिणामी कचरा आणि अतिक्रमणांच्या विळख्यातून अद्याप पारसिक बोगद्याची सुटका झालेली नाही.

अनधिकृत शाळेमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

कळव्याच्या दिशने असलेल्या बोगद्यावर दोन हिंदी माध्यमाच्या शाळांचा काही भाग तोडण्यात आला आहे. त्यातील कळवा हिंदी विद्यालय ही शाळा पहिली ते दहावीपर्यंत असून सुमारे २ हजार ५०० विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. गेल्या कारवाईमध्ये पालिकेने या शाळेच्या काही भागावर हातोडा मारला आहे. मात्र, शाळेने आपली शक्कल लढवून शाळेच्या गच्चीवर छप्पर बांधून तिथे वर्ग भरविण्यास सुरुवात केली आहे. जवळपास शाळा नसल्याने या धोकादायक भागात जीव मुठीत धरून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील प्रवास अजूनही धोकादायकच आहे. पालिका आणि रेल्वे प्रशासनाची याबाबत भेट घेऊन या झोपडय़ा हटविण्याचीही विनंती करणार आहोत.

नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, ठाणे रेल्वे प्रवासी संघटना