खाडय़ांमधून वाहतुकीसाठी जेटी उभारण्याचा प्रस्ताव

शहरांतर्गत वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या ठाणे तसेच आसपासच्या शहरांतील प्रवाशांना वाहतुकीचा आणखी एक पर्याय देण्यासाठी ठाणे महापालिकेने जलवाहतुकीची कल्पना पुढे आणली आहे. ठाणे पट्टय़ातील खाडय़ांद्वारे शहरातील तसेच नवी मुंबई, कल्याण आणि मीरा-भाईंदर येथील ठिकाणांत प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा विचार महापालिकेने चालवला आहे. त्यासाठी ३२ किमीच्या ठाणे खाडीमध्ये जेटी उभारण्याचा प्रस्ताव पालिकेने पुढे आणला आहे. या प्रकल्पाकरिता एका खासगी संस्थेच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले आहे. आता हा प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्य़ाला मोठय़ा प्रमाणात खाडीकिनारा लाभला असून, त्यापैकी खाडीचे बहुतांश क्षेत्र ठाणे शहरामध्ये येते. हे लक्षात घेऊन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जलवाहतुकीचा प्रस्ताव राबविण्याचा निर्णय घेतला असून, त्याकरिता ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या प्रकल्पासाठी एका खासगी संस्थेच्या माध्यमातून खाडीचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यामध्ये जलवाहतुकीचा मार्ग तसेच स्थानके आदीचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. ठाणे, भिवंडी, डोंबिवली, नवी मुंबई आणि मुंबई या शहरांना या वाहतुकीने जोडण्याचा विचार असून, त्याचा ढोबळ आराखडाही तयार करण्यात आला आहे. यासाठी राज्य सरकारची मंजुरी आवश्यक असल्याने हा प्रस्ताव त्यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकल्पाचे काम सुरू होईल, अशी माहिती आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. तसेच जलवाहतुकीसाठी खाडीतील गाळ काढून त्यानंतर पुढील धोरण निश्चित केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ठाणे, गायुमख, मुंब्रा, कळवा, कोपरी, पारसिक, नवीन ठाणे आदी भागात ही सेवा उपलब्ध करून देण्याचा विचार असल्याचेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले. ही वाहतूक सुरू करताना भरती आणि आहोटीचाही विचार केला जाणार असून या काळात ही वाहतूक कशा पद्धतीने सुरू ठेवायची याचाही अभ्यास पालिकेने केला आहे. खासगी लोकसहभागातून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामुळे खासगी संस्थेला हे काम देण्यात येणार असून, त्या संस्थेला मिळणाऱ्या उत्पन्नातील काही वाटा महापालिकेस मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.