मोबाइल, संगणक, इंटरनेट अशा आधुनिक माध्यमांनी जग अगदी जवळ आणले आहे. एकमेकांशी सहज संवाद साधण्याची सुविधा पुरवणारी ही उपकरणे आता ग्रामीण भागातही गरजेची बनू लागली आहेत. मात्र, प्राथमिक सोयीसुविधाच नसतील तर अशी उपकरणे वापरणाऱ्यांची कशी पंचाईत होते, हे जव्हार-मोखाडा या दुर्गम भागांतून अनुभवता येते. मुंबईपासून अवघ्या शंभर-सव्वाशे किमीवर असलेल्या या गावपाडय़ांत मोबाइलचे नेटवर्क पोहोचले असले तरी अजूनही वीजपुरवठा सुरू झालेला नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांना केवळ मोबाइलची बॅटरी चार्ज करण्यासाठी दुसऱ्या गावांत जाऊन दहा रुपये मोजावे लागत असल्याची परिस्थिती आहे.
देशात मोबाइलचे जाळे पसरण्यास गेल्या दशकभरात सुरुवात झाली. मात्र, स्वातंत्र्यापासून पसरायला सुरुवात होऊनही विद्युतपुरवठय़ाचे जाळे अद्याप मोखाडय़ातील अनेक गावांत पोहोचू शकलेले नाही. केवळ वीजच नव्हे, तर पाणी, आरोग्य, रस्ते आणि परिवहन अशा सर्वच प्राथमिक सुविधांची येथे वानवा आहे. पावसाळ्यात तर अनेक पाडय़ांचा बाहय़ जगाशी संपर्कच तुटतो. अशा वेळी मोबाइल हे येथील ग्रामस्थांचे संपर्काचे एकमेव साधन असते. मात्र, दुर्दैवाची बाब म्हणजे वीज नसल्याने येथील गावकऱ्यांना मोबाइलची बॅटरी चार्ज करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. जव्हार तालुक्यात तर काही दुकानदारांनी ‘येथे मोबाइल चार्जिग करून मिळेल’ अशा पाटय़ाच लावल्या आहेत. येथे मोबाइल चार्ज करण्यासाटी दहा रुपये शुल्क आकारले जाते.  
रोटरीसारख्या काही स्वयंसेवी संस्थांनी अशा अनेक पाडय़ांवर सौरदिवे दिले आहेत. त्याचबरोबरच सौरऊर्जेवरील चार्जरही दिले. मात्र सर्वच पाडय़ांना ती सुविधा नाही. त्यामुळे मोबाइल चार्ज करण्यासाठी त्यांना जवळचे वीज असणारे गाव गाठावे लागते. तिथेही भारनियमनामुळे बराच काळ बत्ती गुल असते.
– रघुनाथ किरकिरे, हेदोली गावाचे ग्रामस्थ