हक्काच्या पैशासाठी नागरिकांची रखडपट्टी; कोअर बँकिंग यंत्रणा, इंटरनेट प्रणालीतील बिघाडांचा फटका
टपाल कार्यालयात ठेवलेल्या ठेवीवर मिळणाऱ्या व्याजातून घर खर्च भागविणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, वृद्धांना व्याजाची रक्कम मिळविण्यासाठी टपाल कार्यालयात तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. टपाल कार्यालयातील खिडकीवर लवकर नंबर लागावा म्हणून ग्राहक पहाटे चार वाजल्यापासून रांग लावत असल्याचे चित्र डोंबिवलीत दिसत आहे. विशेष म्हणजे, टपाल कार्यालयातील इंटरनेट आणि संगणकीय यंत्रणा वारंवार बिघडत असल्याने पहाटेपासून रांगा लावणाऱ्या नागरिकांना रित्या हाताने घरी परतावे लागत आहे.
आयुष्यभराच्या जमा शिदोरीतून निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित आणि सुखकरपणे व्यतित करता यावे, यासाठी बहुतांश ज्येष्ठ नागरिक पोस्टाच्या विविध ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करतात. मात्र, टपाल कार्यालयांचे संगणकीकरण (कोअर बँकिंग) केल्यापासून टपाल कार्यालयात जाणाऱ्या ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या दोन महिन्यापासून कल्याण, डोंबिवलीतील टपाल कार्यालयांचे संगणकीकरण व इंटरनेट सुविधेशी टपाल कार्यालये जोडण्यात आल्यापासून ग्राहकांचे व्यवहार जलद होण्यापेक्षा, तासन्तास रांगेत उभे राहण्याची शिक्षा ग्राहकांची पदरी पडली आहे. टपाल कार्यालयांमध्ये इंटरनेट सुविधा देताना ती अधिक क्षमतेची असणे आवश्यक होते. मात्र ५१२ केबीबीएस सुविधेच्या ठिकाणी २५६ केबीबीएस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कार्यालयातील कामाच्या बोजाचा ताण इंटरनेट सुविधेवर पडला, की इंटरनेट यंत्रणा बंद पडते. ही यंत्रणा पुन्हा सुरळीत होण्यास अनेक वेळा एक ते दोन तास लागतात. तोपर्यंत टपाल कार्यालयात पैसे काढणे, मनी ऑर्डर करणे, पैसे भरण्यासाठी आलेले ग्राहक, एजंट यांना तासन््तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. टपाल कार्यालयातील कोअर बँकिंग सुविधा संथ असल्याने एका ग्राहकाचा व्यवहार करताना अनेक वेळा, अर्धा ते एक तास लागतो. हा व्यवहार सुरू असताना अचानक प्रणाली बंद पडली, की सगळे काम ठप्प होते, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
डोंबिवलीतील फडके रस्त्यावरील टपाल कार्यालयाच्या इमारतीच्या बाहेरील भागात एक कागद चिकटविण्यात आला आहे. तेथे पहिल्या प्रथम जो ग्राहक जाईल तेथे त्याने आपले नाव व तेथे कोणत्या वेळेला हजर होतो, याची नोंद करायची आहे. तो कागद पाहिल्यानंतर अनेक ग्राहक पहाटे चार वाजल्यापासून तेथे उपस्थितीच्या नोंदी करीत असल्याचे दिसून आले. टपाल कार्यालयात एक ते दोन व्यवहार झाले की इंटरनेट बंद पडते. तोपर्यंत सर्व व्यवहार ठप्प पडतात.
टपाल कार्यालय की कोंडवाडे?
कल्याण, डोंबिवलीतील टपाल कार्यालयांमध्ये मोकळी हवा नाहीच, पण साधी बसण्याचीही सुविधा नाही. त्यामुळे जिन्यात, मोकळ्यात फतकल मांडून बसण्याशिवाय पर्याय नसतो. अनेक ज्येष्ठ नागरिकांना विविध व्याधी असतात. त्यांना स्वच्छतागृहात जावे लागते. टपाल कार्यालयात तीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे ज्येष्ठ, वृद्धांची सर्वाधिक अडचण होत आहे.