मेगाब्लॉकने विस्कळीत आणि बेलगाम झाल्यामुळे प्रवाशांच्या त्रासाचा निर्देशांक वाढविणारा मध्य रेल्वेचा प्रवास या रविवारी आणखी तापदायक बनला. मुंबईहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावरील ट्रेनच्या पेंटोग्राफला कळवा रेल्वे स्थानकाजवळ रविवारी आग लागली. उन्हाच्या आगीत पोळलेल्या प्रवाशांना ही आग डब्यालाच लागल्याची भीती वाटली आणि त्यातून काही प्रवासी रुळांवर उडय़ा मारून जखमी झाले. या सगळ्या गोंधळामुळे रेल्वेची कर्जतकडे जाणारी वाहतूक एक तासाहून अधिक काळ ठप्प झाली. मुंबईकडून कल्याणच्या दिशेने जाणारी धीमी गाडी रविवारी सकाळी कळवा स्थानकातून बाहेर निघाली. कळवा-मुंब्रा स्थानकादरम्यान गाडीच्या पेंटोग्राफने अचानक पेट घेतला. रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गाडीला आग लागली असल्याचा गैरसमज झाला. प्रवाशांनी जीव वाचविण्यासाठी चालत्या गाडीतून रेल्वे रुळावर उडय़ा मारल्या. या दुर्घटनेत सुप्रिया सुरेश डुमरे (५४), हीना दिलीप पानकनिया (४५) आणि रामदास विठ्ठल चव्हाण (४८) यांना किरकोळ दुखापत झाली असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.