वास्तवाची जाण ठेवून समाजकार्यासाठी दानधर्म करण्याकडे ओढा

भाद्रपदातील दुसरा पंधरवडा अर्थात पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांप्रति आदर व्यक्त करून त्यांच्या स्मृती जपण्याचा काळ. या काळात पूर्वजांच्या नावे भोजनपंक्ती मांडण्यात येतात. परंतु, अंधश्रद्धेकडे वळत चाललेल्या या प्रथेकडे बदलत्या काळानुसार सुज्ञ नागरिक डोळसपणे पाहू लागले आहेत. त्यामुळे पूर्वजांच्या नावाने पिंडदान करण्याऐवजी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना तसेच गरजूंना आर्थिक वा अन्य प्रकारची मदत देण्याकडे आता ओढा वाढत चालला आहे. यानिमित्ताने

‘दाना’चा संकल्प पूर्ण होत आहेच; परंतु सामाजिक भानही जपले जात आहे.

पितृ पंधरवडय़ात आपल्या पूर्वजांच्या नावे त्यांच्या आवडीचे मिष्टान्नाचे भोजन केले जाते. दुपारी घराच्या छतावर अथवा नदीकाठच्या घाटांवर ठेवलेल्या पत्रावळीतले पदार्थ कावळ्याने उष्टावले की पितर जेवले, अशी आपल्याकडे पूर्वापार श्रद्धा आहे. मात्र, आपल्याच आप्तेष्टांमध्ये भोजनावळ घालण्यापेक्षा तेवढीच रक्कम सामाजिक उपक्रमांसाठी देणाऱ्यांची संख्या यंदा वाढल्याचे दिसून येत आहे.  वृद्धाश्रम, अनाथालय, आदिवासी भागातील आश्रमशाळा, विशेष मुलांचे वसतिगृह चालवणाऱ्या संस्थांना पितृपक्षात अशा दातृत्वाचा अनुभव  विशेष करून येऊ लागला आहे.

गरीब, गरजू, पीडित, दुर्लक्षित घटकांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या कार्यात आर्थिक अडसर मोठा असतो. त्यामुळे यथाशक्ती मदत करू इच्छिणाऱ्या दात्यांच्या शोधात वर्षभर या संस्था असतात. अलीकडच्या काळात मात्र, पितृपक्षात अनेक नागरिक स्वत:हून या संस्थांकडे येऊन मदत देऊ लागले आहेत. यासोबतच विविध सणसमारंभ, मुला-मुलींचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस असे आनंदाचे क्षणही सामाजिक संस्थांमध्ये साजरे करण्याकडे नागरिकांचा भर वाढत आहेत.

श्रद्धा ही मानवी आयुष्यातील महत्त्वाची भावना आहे. मात्र धार्मिक, पारंपरिक कर्मकांड करण्यापेक्षा समाजातील सेवाभावी संस्थेस आर्थिक हातभार लावण्याचा पर्याय संवेदनशील नागरिक स्वीकारू लागले आहेत. हल्ली पितृ पंधरवडय़ात अशा मदतीचा ओघ वाढत आहे. 

– अविनाश बर्वे, संस्थापक विश्वस्त आणि सल्लागार, अमेय पालक संघटना 

माध्यमिक टप्प्यानंतरच्या उच्च शिक्षणाचा खर्च आता गरिबांनाच काय मध्यमवर्गीयांनाही परवडेनासा झाला आहे. त्यामुळे अशा घरातील अनेक मुले इच्छा आणि गुणवत्ता असूनही त्यांच्या क्षमतेएवढी शैक्षणिक अर्हता पदरात पाडून घेऊ शकत नाहीत. वैद्यकीय शिक्षण महाग आहेच, पण अभियांत्रिकी विषय शाखांचे सरासरी वार्षिक शुल्कही एक लाख चाळीस लाखांच्या घरात आहे. त्यामुळे अशा मुलांना शिक्षणासाठी मदत करणे ही समाजाची जबाबदारी आहे. पितरांच्या स्मरणार्थ अनेकजण अशा प्रकारच्या मदतीसाठी पुढे येऊ लागले आहेत, हे सुचिन्ह आहे.

– रवींद्र कर्वे, सामाजिक कार्यकर्ते

आमच्या संस्थेत २०० प्रौढ मतिमंद निवासी स्वरूपात आहेत. हल्ली अनेकजण वैयक्तिक सुखाचे क्षण साजरे करण्यासाठी संस्थेत येतात. यथाशक्ती दान देतात. मात्र पितृ पंधरवडय़ात प्रामुख्याने अन्नदान केले जाते. यंदाही या पंधरवडय़ातील बहुतेक सर्वच दिवशी आमच्याकडे पितरांच्या स्मरणार्थ अन्नदान करण्यात येत आहे.

– विश्वास गोरे, आधार, बदलापूर