अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात फेरीवाले आणि रिक्षांच्या वाढलेल्या गर्दीमुळे रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांना होणाऱ्या त्रासावर लोकप्रतिनिधी, पोलीस, नगरपालिकेचे अधिकारी, रिक्षा व फेरीवाले संघटनांचे पदाधिकारी यांनी घेतलेल्या बैठकीत तोडगा काढत येथे एकदिशा मार्ग प्रायोगिक तत्त्वावर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी काही रिक्षाचालकांनी रस्ता बंद करण्यासाठी लावलेल्या खांबांपैकी एक खांब काढून टाकत या एकदिशा मार्गाच्या निर्णयालाच हरताळ फासला आहे.
अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागातील रस्ता हा व्यापारी, फेरीवाले, रिक्षाचालक, त्यात खाजगी वाहने यांमुळे दाटीवाटीचा मार्ग झाला असून त्याचा रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी झालेल्या बैठकीत या मार्गाची एक बाजू खांब लावून एकदिशा मार्ग करण्याचा निर्णय झाला होता व सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ५ ते ९ या कालावधीत रिक्षासह सर्व प्रकारच्या खाजगी वाहनांना बंदी करण्यात आली होती. यावेळेत अंबरनाथ पोलीस स्थानकाजवळून जाणाऱ्या डीएमसी कंपनीजवळील रस्त्यावरून वाहनांना प्रवेश दिला जाणार होता. प्रायोगिक तत्त्वावर घेतलेल्या या निर्णयाच्या वेळी रिक्षा युनियनचे व फेरीवाल्यांचे पदाधिकारीही उपस्थित होते. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांना विस्थापित करू नका, अशी मागणीही केली होती. या बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी मात्र रिक्षाचालकांनी या एकदिशा मार्गाचे खांब उपटून टाकले व वाहतुकीला सुरुवात केली. रिक्षांच्या पाठोपाठ खाजगी वाहनेही तिथून जाऊ लागली आहेत. त्यामुळे पुन्हा या भागात नागरिकांची कोंडी होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, याबाबत शहर पोलिसांनीच हे खांब लावले असल्यामुळे त्यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी या प्रश्नावर उत्तर देण्यास मात्र टाळाटाळ केली. त्यामुळे स्थानिक आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, अधिकारी यांच्या बैठकीत घेण्यात आलेल्या या बैठकीतील निर्णयाला रिक्षावाल्यांनी हरताळ फासला असून या भागात पुन्हा नागरिकांची कोंडीच होणार असे चित्र निर्माण झाले आहे.