१४ जणांवर अटकेची कारवाई

पेट्रोल चोरी करून ग्राहकांची लूट करणाऱ्या राज्यभरातील विविध पंपांवर ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून गेल्या आठ दिवसांपासून धाडसत्र सुरू आहे. या कारवाईमध्ये आतापर्यंत राज्यातील विविध शहरातील ४४ पंपांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ३० पंपांवर पेट्रोल चोरी होत असल्याचे उघड झाले असून या प्रकरणी १४ जणांवर आतापर्यंत अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान पेट्रोल भरणाऱ्या यंत्रामध्ये वेगवेगळ्या पद्घतींचा वापर करून पेट्रोल चोरी केली जात असल्याची बाब समोर आली आहे, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली.

ठाणे आणि डोंबिवली शहरातील दोन पंपांवर ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धाड टाकून त्या ठिकाणी सुरू असलेली पेट्रोल चोरी उघड केली होती. या ठिकाणी मायक्रोचीपचा वापर करून पेट्रोल चोरी केली जात होती. तसेच राज्यातील विविध पंपांवर अशाच प्रकारे पेट्रोल चोरी सुरू असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या हाती आली होती. त्याआधारे ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने राज्यभरातील विविध पंपांवर धाडसत्र सुरू केले असून गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या कारवाईत एकूण ४४ पंपांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ठाण्यातील २०, नाशिकमधील ९, रायगडमधील ६, पुण्यातील २, साताऱ्यामधील २, मुंबईमधील २ आणि औरंगाबादमधील ३ पेट्रोल पंपांचा समावेश आहे. एकूण ४४ पैकी ३० पंपांवर पेट्रोल चोरी होत असल्याचे समोर आले आहे तर उर्वरित १४ पंपांवर मात्र काहीच आढळून आलेले नाही. पेट्रोल भरणाऱ्या यंत्रामध्ये मायक्रोचीप, पासवर्ड तसेच नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करून पेट्रोल चोरी सुरू असल्याची बाब कारवाईदरम्यान समोर आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण १४ जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी सातजण न्यायालयीन कोठडी तर सातजण पोलीस कोठडीत आहेत. या सातपैकी सहाजण टेक्निशियन तर एक जण व्यवस्थापक आहे, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली.

नागपुरात पासवर्डचा वापर..

नागपूर येथील मानकापूरमधील रबज्योत नावाच्या पेट्रोल पंपावर ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने सोमवारी धाड टाकली. या पंपांवर पाच लिटरमागे दोनशे मिलिलिटर पेट्रोल चोरी होत होती. पेट्रोल भरणाऱ्या यंत्रामध्ये असलेल्या कंट्रोल गार्डमध्ये पासवर्ड टाकून चोरी केली जात होती, अशी माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली.