मायक्रोचिप बसवून पेट्रोल चोरी करण्याचे प्रकार उघडकीस

पेट्रोल भरणाऱ्या यंत्रात मायक्रोचिप बसवून त्याद्वारे ग्राहकांची लूट करण्याचे लोण आता मुंबईपर्यंत पोहोचले आहे. अशा प्रकारे पेट्रोल चोरी करणाऱ्या ठाणे आणि डोंबिवलीतील दोन पेट्रोल पंपांवर पोलिसांनी शनिवारी कारवाई केली. या दोन्ही पंपांप्रमाणेच राज्यातील इतर शहरांमधील पंपचालकांकडून अशाच प्रकारे ग्राहकांची लूट सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून त्याआधारे संबंधित पंपचालकांवर कारवाई करण्यासाठी ठाणे पोलिसांनी चार पथके राज्यातील विविध शहरांत रवाना केली आहेत. ठाणे पोलिसांच्या या कारवाईमुळे राज्यात पेट्रोल चोरीचे मोठे प्रकरण उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.

उत्तर प्रदेशातील विविध पंपांवर पेट्रोल चोरीचे प्रकरण अलीकडेच उघडकीस आले होते. पेट्रोल भरणाऱ्या यंत्रामध्ये मायक्रोचिप बसवून त्याद्वारे ग्राहकांची लूट केली जात असल्याचे त्यातून उघड झाले. या प्रकरणाचे धागेदोर थेट डोंबिवली आणि पुण्यापर्यंत पोहोचले. डोंबिवलीतून विवेक शेटय़े तर पुण्यातून अविनाश नाईक या दोघांना उत्तर प्रदेश व ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने गेल्या महिन्यात अटक केली. या कारवाईनंतर ठाणे परिसरातही अशा प्रकारे पेट्रोल चोरी सुरू आहे का, याची माहिती संकलित करण्याचे काम ठाणे पोलिसांनी सुरू केले होते. त्यात डोंबिवलीतील मानपाडा भागातील अरमान पेट्रोल पंप आणि ठाण्यातील वागळे इस्टेटमधील एआयकेआय या पेट्रोल पंपांवर ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे उघड झाले. त्यानुसार गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री अरमान पेट्रोल पंपावर तर शनिवारी एआयकेआय पंपावर कारवाई करून या दोन्ही पेट्रोल पंपांना सील ठोकले. या प्रकरणी पोलिसांनी श्यामलाल देढिया याला अटक केली आहे.

सूत्रधार विवेक शेटय़ेच

ठाणे आणि डोंबिवलीमध्ये कारवाई करण्यात आलेल्या दोन्ही पंप चालकांना विवेक शेटय़े यानेच पेट्रोल चोरीसाठी मायक्रोचिप पुरविल्याची बाब तपासात समोर आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये दूरनियंत्रकाच्या साह्य़ाने मायक्रोचिपमध्ये बदल करून पेट्रोल चोरी केली जायची. परंतु या दोन्ही पंपांवर दूरनियंत्रकाचा वापर होत नव्हता. असे असले तरी उत्तर प्रदेशमधील पेट्रल पंपांपेक्षा या दोन्ही ठिकाणी अत्याधुनिक मायक्रोचिपता वापर करण्यात येत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

चोरी अशी सुरू होती..

प्रत्येकी पाच लिटरमागे २०० मिलिलिटर इतकी पेट्रोलची चोरी या दोन्ही पेट्रोल पंपांवर होत होती. मायक्रोचिपच्या आधारे ही चोरी केली जात होती. दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता, असा पोलिसांचा संशय आहे. पेट्रोल पंपांवरील कारवाईच्या वेळी ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह सहपोलीस आयुक्त मधुकर पाण्डे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे, उपायुक्त सुनील लोखंडे, सहाय्यक आयुक्त मुकुंद हातोटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आदी अधिकारी उपस्थित होते.

ठाणे आणि डोंबिवलीप्रमाणे राज्यातील इतर शहरांतही पेट्रोल पंपांवर ग्राहकांची लूटमार सुरू असल्याची माहिती मिळाली असून त्या पंपांवरही कारवाई करण्यात येईल.  – परमबीर सिंग, पोलीस आयुक्त, ठाणे