कल्याण-डोंबिवली शहराच्या अनेक भागात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई जाणवू लागली आहे. परंतु बारवी धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांना छोटीमोठी छिद्रे पाडून त्यातून पाण्याचा अमर्याद वापर करून वाहने धुण्याचा धंदा सध्या काटई ते अंबरनाथ रस्त्यावर जोरात सुरू आहे. जलवाहिन्यांना शीळफाटा, काटई, अंबरनाथ परिसरात छिद्रे पाडण्यात येत आहेत. या जलवाहिन्यांना लागूनच वाहने धुण्याची दुकाने थाटण्यात आली असून चोरून नेण्यात येणारे पाणी त्यासाठी वापरले जात असल्याची माहिती पुढे आली आहे.
हा प्रकार काही महिन्यांपासून शिळफाटा रस्त्यावरील काटई ते अंबरनाथ पाइपलाइन रस्त्यावर सर्रास सुरू आहे. काटई (शीळफाटा) ते अंबरनाथ मार्गावर वाहनांची दुरुस्ती करणारी तीन वर्कशॉप आहेत. ही दुकाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ठाणे, कल्याण डोंबिवली भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांना खेटून सुरू करण्यात आली आहेत. या जलवाहिन्यांना ड्रील मशीनच्या सहाय्याने भोक पाडण्यात येते. त्यामध्ये एक नळ जोडणी टाकण्यात येते. जलवाहिनीतून मोठय़ा दाबाने पाणीपुरवठा सुरू असल्याने वीजपुरवठा न घेता वर्कशॉप चालकांना मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध होत आहे. सकाळी आठ ते रात्री उशिरापर्यंत हे वर्कशॉप चालक जलवाहिनीतील पाणी चोरून वापरत आहेत. काही वर्कशॉपच्या ठिकाणी वापराच्या पाण्यावर नियंत्रण असावे म्हणून विजेचे बोर्ड बसवून त्याद्वारे संचलन केले जात आहे. एकीकडे शहरातील नागरिक पाणी टंचाईमुळे हैराण आहेत.

दादागिरी कायम
एमआयडीसीच्या अंबरनाथ ते काटई दरम्यानच्या मुख्य जलवाहिन्यांवर काही लोकांनी नळजोडण्या घेतल्याचे दिसून येते. संबंधितांना यापूर्वीच या नळजोडण्या काढण्यासाठी ताकीद दिली होती. काही नळजोडण्यांवर यापूर्वी करण्यात आली होती. ही कारवाई करताना संबंधितांकडून दादागिरी करण्यात येते. धमक्या दिल्या जातात. नळजोडण्या काढण्याची कारवाई झाली की पुन्हा पाठ फिरली की त्या नळ जोडण्या जोडून घेण्यात येतात. स्थानिक रहिवाशांची ही दुकाने आहेत, असे एमआयडीसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.