संयुक्त जंगल व्यवस्थापन समिती (जेएफएमसी) या झाडांच्या जतनासाठी काम करणाऱ्या समितीच्या सहकार्याने प्राक्सएअर या कंपनीने मुरबाड-खोपोली रस्त्यावर तब्बल ११ हजार झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. ‘शाश्वत’ असे या उपक्रमाचे नाव असून त्या माध्यमातून २०१६ पर्यंत जगभरात १ लाख झाडांची झाडे लावण्यात येणार आहेत. त्यापैकी अकरा हजार झाडे मुरबाड-खोपोलीस रस्त्यावर लावण्यात येणार आहे.
सामाजिक बांधिलकीच्या भावनेने विविध व्यावसायिक कंपन्यांच्या माध्यमातून वृक्षारोपणाचे उपक्रम राबवले जात आहे. वन अधिकारी आणि कंपनी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नुकतीच या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत १० हेक्टर ओसाड जमिनीचे जंगलात रुपांतर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे लागवड पूर्ण झाल्यानंतर प्राक्सएअरचे कर्मचारी या रोपांचे संरक्षण करून त्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत काळजी घेणार आहेत. यावेळी प्राक्सएअर इंडियाचे अनुज शर्मा, ठाणे वन विभागाचे किशोर ठाकरे उपस्थित होते.