पावसाळा हा खरे म्हणजे वनस्पतींच्या वाढीसाठी उपयुक्त असतो. वातावरणात असणारी ७० टक्क्यांपेक्षा जास्त आद्र्रता, योग्य प्रकारे पडणारा पाऊस आणि त्यामुळे मिळणारे पाणी या दोन्हींमुळे वनस्पती चांगल्या प्रकारे वाढतात.
आपल्या गच्चीत, बाल्कनीत झाडे लावण्यासाठी हा योग्य हंगाम आहे. या काळात आपल्या मित्रमैत्रिणींकडून आपल्याला आवडणाऱ्या झाडांची कटिंग आणून कुंडीत लावावी. त्यासाठी हा उत्तम काळ आहे. कारण हवेतल्या दमटपणामुळे झाडांच्या कटिंगना मुळे येण्यास अनुकूल वातावरण असते. ज्या झाडांची वाढ शास्त्रीय पद्धतीने होऊ शकते, अशा झाडांची कटिंग बोटाएवढय़ा जाड फांद्यांचे तुकडे केल्यास व ते मातीत लावल्यास त्यापासून नवीन झाड तयार होण्याची ९० टक्के शक्यता असते.
वातावरणात असणारी आद्र्रता जशी शास्त्रीय वाढीस उपयुक्त असते, तशी ती रोग व किडींना वाढीस अनुकूल असते. झाडाची रोगप्रतिकारशक्ती झाडाला मातीमधून मिळणाऱ्या योग्य घटकांमधून मिळते. अन्नद्रव्यांचा असंतुलित वापर जर आपण केला तरच वनस्पतींचे रोग वाढीस लागतात. योग्य अन्नद्रव्य व मातीमधील पाण्याचा योग्य निचरा असल्यास झाडाची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
हानीकारक बुरशी
नियंत्रणात आणण्यासाठी..
१ लिटर पाण्यात कपभर गोमूत्र व २ चमचे हळद पावडर एकत्र करून ते पाणी कुंडीतील झाडास थोडे थोडे द्यावे.
शेवग्याचा पाला १०० ग्रॅम घेऊन त्याची मिक्सरमध्ये चटणी करावी आणि ही चटणी ५ लिटर पाण्यात मिसळून हे पाणी झाडाला द्यावे.
कृषी केंद्रामध्ये ट्रायको डर्मा नावाची पावडर मिळते. ती एक बुरशी आहे, पण ती हानीकारक बुरशीचा प्रादुर्भाव नियंत्रित करते. कुंडीतील मातीत दर महिन्यास १ चमचा ही पावडर मिसळावी.
कुंडीमध्ये पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी.
पागोळ्यांचे पाणी जोरात कुंडीत पडणार नाही याची काळजी घ्यावी.
किडीचा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी..
हवा ढगाळ पण पाऊसच पडत नाही. असे चार-पाच दिवस झाल्यास असे उष्ण-दमट हवामान किडींच्या वाढीस अनुकूल असते. अशा वेळी कडुलिंब, दशपर्णी अर्क, गोमूत्र यांची फवारणी करावी. यामुळे कीड झाडावर येण्यास परावृत्त होते. आलीच तर तिची वाढ होत नाही.
झाडांची छाटणी करणे आवश्यक असेल तर वरील अर्क, गोमूत्राची आधी फवारणी करून मग छाटणी करावी. छाटणीनंतर १ ते २ महिन्यांत नवीन पालवी येते. तिचे रस शोषणाऱ्या किडींपासून संरक्षण करावे.
मुळांसाठी आवश्यक
नवीन कटिंग कुंडीत लावताना त्याला लवकर मुळे येण्यासाठी मुळे फुटण्याचे संजीवक ‘कॅरडॅक्स’ याच्या पावडरमध्ये मातीत जाणारे फांदीचे टोक बुडवून मग ते कटिंग मातीत लावावे. यामुळे लवकर व चांगली मुळे येतात. झाडांचे कटिंग जर लांबून आणावयाचे असतील तर त्याची पाने कापावीत व पानांचे देठ कटिंगवर राहतील याची काळजी घ्यावी. पाने फांदीवर ठेवल्यास फांदीत साठवलेले अन्न ती स्वत:ला जगवण्यासाठी वापरतात. ही पाने गळून जाणार असतात, पण तोपर्यंत ती फांदीतील अन्न संपवितात. यामुळे ‘मुळे’ फुटण्यास व वाढण्यास लागणारे अन्नच फांदीत शिल्लकच राहत नाही. या फांद्या कापताना त्या चिरणार नाहीत याची काळजी घ्यावी. नाही तर मुळे फुटण्यास त्रास होतो. या कापलेल्या फांद्या प्लॅस्टिकच्या पिशवीतून घरी आणाव्यात म्हणजे बाष्पीभवन कमी होईल व फांदी लवकर जीव धरेल.
नर्सरीतून झाडे विकत घेताना त्या झाडाचे खोड जाड असेल असे रोप खरेदी करावे. ते झाड घरी आणल्यानंतर लगेच लाऊ नये. प्रवासात पिशवीतील मातीचा गोळा हललेला असतो, त्यामुळे त्याची मुळेसुद्धा तुटली असण्याची शक्यता असते. हा मातीचा गोळा परत घट्ट होण्यासाठी ५-७ दिवस लागतात. पिशवी हळूच कापून माती हलू न देता तसेच झाड कुंडीत लावल्यास मुळे दुखावली जात नाहीत व झाड जगण्याचे प्रमाण वाढते.
पावसाळ्याच्या दिवसात गॅलरीतील झाडांना थोडे तरी पाणी रोज देणे आवश्यक असते. जिथे पावसाची झड येत नाही तिथे एक दिवस जरी पाऊस पडला नाही तरी पाणी घालावे लागते. पावसाळ्यात घरातील झाडे शक्य असल्यास बाहेर जेथे सरळ ऊन पडणार नाही अशा जागी ठेवावीत. परावर्तित सूर्यप्रकाश त्यांना पुरेसा होतो. हा परावर्तित सूर्यप्रकाश ढगाळ हवामानामुळे घरात अजिबात मिळत नाही. झाडांना योग्य प्रमाणात पाणी व योग्य वेळी बुरशीनाशके व कीडनाशके वापरून आपण आपली बाग सांभाळू या.