सामाजिक संस्थांचा पुढाकार
शहरांवरील अस्वच्छतेचा डाग पुसण्यासाठी डोंबिवलीतील विविध संस्था, जाणत्या मंडळींनी संघटित होऊन ‘व्हिजन डोंबिवली’ हा शहर स्वच्छतेचा अभिनव प्रकल्प सुरू केला आहे. हे लक्षात घेऊन महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या पुढाकाराने कल्याणमधील विविध संस्था, व्यक्तींना संघटित करून कल्याण शहर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. शहर स्वच्छतेचा भाग म्हणून कल्याण डोंबिवलीत १ मेपासून प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे.
कल्याण शहर स्वच्छतेबाबत चर्चा करण्यासाठी शहरातील विविध संस्था, व्यक्तींना आचार्य अत्रे रंगमंदिरात आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी महापौर राजेंद्र देवळेकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेश चंद्र, अतिरिक्त आयुक्त संजय घरत, डॉ. प्रा. वैशाली वीर, पर्यावरण दक्षता मंचच्या रुपाली शाईवाले उपस्थित होते. शहर स्वच्छतेबाबत महापालिका म्हणून प्रशासनाने हाती घेतलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती यावेळी संजय घरत यांनी दिली. प्रशासन शहरात बायोगॅस सयंत्र उभारणार, ओला, सुका कचऱ्याची विल्हेवाट, प्रभागातील कचऱ्याची प्रभागात विल्हेवाट लावणे, उंबर्डे, बारावे, मांडा येथे शास्त्रोक्त पद्धतीने कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यात येणार आहेत, असे प्रशासनातर्फेसांगण्यात आले.
ओला, सुका कचरा वेगळा करण्यासाठी प्रत्येक सोसायटीत दोन कचरा पेटय़ा देण्यात येणार आहेत. या प्रकल्पाची सुरुवात पालिका अधिकाऱ्यांपासून केली जाणार आहे, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. प्रत्येक रहिवाशाने घरातील, सोसायटीतील कचरा आवारात कसा नष्ट होईल या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे महापौर देवळेकर यांनी सांगितले. शहरातील प्लास्टिकचा वापर करण्यासाठी प्रशासनाने कठोर निर्णय घेतले आहेत, असे सांगून महापौरांनी प्लास्टिक बंदीचा निर्णय जाहीर केला.

१ मेपासून बंदी लागू
महापालिका हद्दीत १ मेपासून प्लास्टिक वापरावर पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. प्लास्टिक वापराची अंमलबजावणी तंतोतंत करावी म्हणून व्यापाऱ्यांना महापालिकेकडून नोटिसा देण्यात येणार आहेत. आरोग्य निरीक्षकांना प्लास्टिक वापर करणाऱ्यांवर कारवाईसाठी दंडात्मक अधिकार देण्यात आले आहेत. त्रयस्थ व्यक्तींची सदिच्छा दूत म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे.