कल्याणातील अनंत वझे संगीत, कला व क्रीडा प्रतिष्ठानतर्फे बुद्धिबळ खेळाच्या प्रचारासाठी आणि गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नुकतेच कल्याणातील सवरेदय मॉल येथे ‘खेळ बुद्धिबळाचा ग्रँडमास्टर्सच्या संगे’ या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बुद्धिबळ स्पर्धेमध्ये २२२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये महिला ग्रँडमास्टर ईशा करवडे, इंटरनॅशनल मास्टर जयंत गोखले, चिन्मय कुलकर्णी यांनी १६० विद्यार्थ्यांबरोबर एकाच वेळी बुद्धिबळाचा डाव मांडत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. खुल्या वयोगटात झालेल्या स्पर्धेसाठी एकूण वीस हजार रुपयांची पारितोषिके वितरित करण्यात आली. ९ वर्षांखालील गटात झालेल्या स्पर्धेत अक्षित झा, १२ वर्षांखालील गटात सृष्टी श्रीधर, १२ वर्षांवरील गटात अमर नंदू आणि खुल्या गटात प्रणव शेट्टी यांनी बाजी मारली. विजेत्यांना कल्याण विष्णूजीकी रसोईचे संदीप कल्याणकर, अनंत वझे संगीत, कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुमेधा वझे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.डॉ. हेमंत मोरे, डॉ. सुरेश फडके, संजय काळुखे, मांगीलाल जैन, डॉ. गौरी वझे, डॉ. ईशा पानसरे, मकरंद शिंत्रे आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.