ठाण्यातील प्रमुख मैदानांवर प्रदर्शने, उत्सवांचे कार्यक्रम; ऐन सुट्टीत मैदानी खेळांना मुले मुकणार
एकीकडे संगणकीय आणि मोबाइल गेमच्या वेडात हरवलेली मुले मैदानी खेळापासून दुरावत चालल्याची ओरड होत असताना, ठाणे महापालिकेच्या ‘कमाई’ धोरणामुळे ऐन सुट्टय़ांच्या हंगामात मुलांना मैदानाची दारे बंद होत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहे. बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणांमुळे शहरातील मैदानांची संख्या रोडावत असताना उरल्यासुरल्या मैदानांपैकी बहुतांश ठिकाणी प्रदर्शने, उत्सव आणि महोत्सवांचे आयोजन करण्यात आल्याने मैदानी खेळांसाठी जागाच शिल्लक नसल्याचे दिसून येत आहे. आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी ठाण्यातील गावदेवी, शिवाजी आणि भगवती ही प्रमुख मैदाने भाडय़ाने दिली आहेत. त्यामुळे ‘आम्ही खेळायचे कुठे’ असा सवाल क्रीडापटू आणि मुले विचारत आहेत.
शहराच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या गावदेवी मैदानात बाराही महिने विविध प्रदर्शने भरलेली असतात. त्यामुळे हे मैदान खेळासाठी आहे की प्रदर्शनासाठी, असा सवाल सुरुवातीपासून उपस्थित केला जातो. या मैदानात मागील पंधरा दिवसांपासून महाराष्ट्र व्यापारी पेठ प्रदर्शन सुरू होते. ते संपत नाही तोच या ठिकाणी १ मे ते १० मे या कालावधीत आंबा महोत्सव भरणार आहे.
गावदेवी मैदान आणि खारकर आळी येथील आर्य क्रीडा मंडळ या ठिकाणी खेळाडूंचा ओढा असतो. यापैकी गावदेवी मैदानात महत्त्वाचे क्रिकेट सामने होत असतात. अनेक क्रीडा मंडळांचे खेळाडू सरावासाठी गावदेवी मैदानात हजेरी लावतात. मात्र या ठिकाणी सतत होणाऱ्या प्रदर्शनांमुळे खेळाडूंना सरावापासून मुकावे लागत आहे. पंधरा दिवसांपूर्वी सुरू झालेल्या महाराष्ट्र व्यापारी पेठ प्रदर्शनामुळे गावदेवी मैदान व्यापलेले होते. यानंतर खेळण्यासाठी मैदान उपलब्ध होईल अशा आशेवर असणाऱ्या खेळाडूंना आंबा महोत्सवामुळे दहा दिवस खेळता येणार नसल्याने खेळाडूंकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी नौपाडय़ातील भगवती शाळेच्या मैदानात ग्राहक पेठ आणि शिवाजी मैदानात चैत्र उत्सवाचे आयोजन केले होते. त्यानंतर पुन्हा हे मैदान अशाच एका प्रदर्शनामुळे व्यापले गेले आहे.
मुख्यत: खेळण्यासाठी असलेल्या गावदेवी मैदानाचा उपयोग वाहन पार्किंगसाठी केला जातो. संध्याकाळच्या वेळी गावदेवी मैदानात वाहनांची गर्दी असते. प्रदर्शन संपल्यावर आयोजकांकडून मैदानाचा परिसर स्वच्छ केला जात नाही. मंडपाचे बांबू रोवण्यासाठी मैदानात वारंवार खड्डे केले जातात. तेही नीट बुजवले जात नाहीत.

खेळाच्या सामन्यांवर गदा
चार ते पाच महिने आधी प्रदर्शनाची नोंदणी होत असते. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शनामुळे गावदेवी मैदानात होणारा टेनिस बॉल क्रिकेट सामना नियोजित वेळेऐवजी पुढे ढकलण्यात आला. मात्र प्रदर्शन लांबल्याने अखेरीस सामना रद्द करावा लागला अशी माहिती कोळीवाडा क्रिकेट संघाचे खेळाडू सचिन भोसले यांनी दिली. दरम्यान, महापालिकेच्या धोरणानुसार ठाणे शहरातील मैदाने कला, सांस्कृतिक तसेच सामाजिक उपक्रमांना नोंदणीने देण्यात येतात. ही नोंदणी यापूर्वीच झाली असल्याने ती ऐन वेळेस रद्द करता येत नाही, असे पालिकेचे साहाय्यक आयुक्त मंगल िशदे यांनी सांगितले.