ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने संशयित आरोपीला रुग्णालयातील स्ट्रेचरवरुन फरपटत नेल्याचा प्रकार समोर आला आहे. भिवंडी-वाडा रोडवरील वारेट गावच्या हद्दीत २३ जुलैच्या रात्री वाईन्सच्या दुकानावर गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे सहा जणांचे पोलिस पथक भिवंडी तालुक्यातील वैजोळे येथील बबन बालाजी पाटील याला संशयित म्हणून ताब्यात घेण्यासाठी गेले. त्यावेळी पोलिसांनी त्याला मारहाण केली. या मारहाणीमध्ये जखमी झालेल्या बबनला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर बुधवारी पोलिसांनी त्याला रुग्णालयातील स्ट्रेचरवरुन फरफटत पोलीस ठाण्यात डांबले.

बबन यांच्यावर कौशिक रुग्णालयात उपचार सुरु होते. डॉक्टरांनी त्याला ‘डिसचार्ज’ दिला नव्हता. रुग्णालयातील बिल न देता पडघा पोलिसांनी जबरदस्तीने रुग्णालयातील कपड्यावरच कोठडीत डांबल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला आहे. यावर रुग्णालयातील बिलाशी आमचा काही सबंध नाही, असे पडघा पोलिसांनी स्पष्ट केले असून हा प्रश्न संशयित आरोपीच्या नातेवाईक आणि डॉक्टरचा असल्याचे ते म्हणाले. पोलिसांनी केलेल्या मारहाणी प्रकरणी बबनने तक्रार दाखल केली आहे. मात्र आमच्या पर्यत ती तक्रार आली नाही. तक्रार आल्यास आम्ही चौकशी करून योग्य ती कारवाई करु, असे पोलिसांनी सांगितले. संशयितासोबत झालेल्या झटपटीमध्ये तीन पोलीस जखमी झाल्याचे सांगण्यात आले.

बबन याच्यावर उपचार सुरु असताना ठाणे नौपाडा पोलिसांनी त्याची जबानी घेतली. त्यावेळी त्याने ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने बेदम मारहाण केल्याचे सांगितले. नौपाडा पोलीस ठाण्यातून बबन याच्या जबाबाचा अहवाल पडघा पोलीस ठाण्यात पाठवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली. मात्र मारहाण करणाऱ्या पोलिसांच्या विरोधातील कारवाई टाळण्यासाठी पडघा पोलीस चालढकल करत असल्याचे दिसून आले.