पोलिसांच्या बंदोबस्तामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन मोडीत; प्रवाशांचा सुटकेचा निश्वास, कार्यकर्त्यांची मात्र ‘चमकोगिरी’

एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाबाहेरील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीचा निषेध म्हणून मध्य रेल्वेची वाहतूक रोखून धरण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मनसुबे पोलिसांनी मंगळवारी उधळवून लावले. ऐन गर्दीच्या वेळी कळवा स्थानकात शिरून ‘रेल रोको’ करण्याचा राष्ट्रवादीचा बेत पाहून पोलिसांनी मंगळवारी सकाळपासूनच या स्थानकात प्रचंड बंदोबस्त केला. त्यामुळे मोठमोठय़ाने घोषणाबाजी करत स्थानकात रेल रोको करण्यासाठी दाखल झालेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकत्र्य़ाना अवघ्या दीड मिनिटांत आंदोलन आटोपते घ्यावे लागले. ऐन गर्दीच्या वेळी होऊ घातलेल्या या ‘रेल रोको’मुळे प्रवाशांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण होते; परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही.

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये आणि देशात बुलेट ट्रेन आणण्यापेक्षा रेल्वेच्या समस्या सोडवाव्यात, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कळवा रेल्वे स्थानकात हे आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले होते. एल्फिन्स्टनची घटना घडल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ठाणे शाखेने या आंदोलनाची हाक दिली होती. त्यामुळे पोलिसांसह प्रवाशांनाही या आंदोलनाची कल्पना होती. त्यामुळे सोमवारी सायंकाळपासूनच स्थानिक पोलीस हे आंदोलन मोडीत काढण्याच्या तयारीला लागले होते. मोर्चाची पूर्वकल्पना असल्याने मंगळवारी सकाळी सात वाजेपासूनच लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे सुमारे ५०० पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण रेल्वे स्थानकाला छावणीचे रूप आले होते. आंदोलन झाले तरी चालेल, पण रेल्वे रोको होऊन द्यायचा नाही असा जणू चंगच पोलिसांनी बांधला होता.

सकाळी साडेआठ वाजल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हातात पक्षाचे झेंडे आणि पोस्टर्स घेऊन कळवा रेल्वे स्थानकाच्या दिशेने येत होते. मात्र, पोलिसांचा ताफा स्थानकाबाहेर असल्याने या ताफ्याला रेल्वे स्थानकाबाहेर रोखण्यात यश आले. यानंतर नऊ वाजता आमदार जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह काही कार्यकर्ते स्थानक परिसरात आले. त्यानंतर ९ वाजून १३ मिनिटांची मुंबईच्या दिशेने जाणारी एक लोकल आली. ती गाडी रेल्वे स्थानकात थांबल्यानंतर आव्हाडांसह १५ ते २० कार्यकर्ते रेल्वे रुळांवर उतरले. मात्र, अवघ्या दीड मिनिटांतच त्यांना बाहेर खेचून काढण्यात आले.

जेमतेम दीड-दोन मिनिटांत आंदोलन पूर्ण होताच उपस्थित कार्यकर्त्यांनी कळवा स्थानकात छायाचित्र काढण्यासाठी मात्र स्वत:ला झोकून दिल्याचे पाहायला मिळत होते. रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे आंदोलन मोडीत काढण्यात आल्याने ऐन गर्दीच्या वेळेत लोकल गाडय़ा रखडल्या नाहीत. दरम्यान, स्थानकातील पादचारी पुलांची अवस्था गंभीर आहे, ती सुधारावी तसेच बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखविण्यापेक्षा मध्य रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी या वेळी आव्हाड यांनी केली.