आजच्या डिजिटल युगात सुध्दा सुशिक्षित युवकांकडून हुंड्यासाठी लग्न मोडण्याच्या घटना घडताना दिसतात. लग्न ठरलेल्या मुली आपल्या कुटुंबीयांची आर्थिक तगमग सहन करू शकत नसल्याने आत्महत्या करीत असताना, भिवंडी तालुक्यातील युवतीने हुंड्यामुळे लग्न मोडल्यानंतर खंबीरपणे कुटुंबियांना धीर देत हुंडा मागणाऱ्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे धैर्य दाखविले आहे.

भिवंडी तालुक्यातील पडघ्या नजीकच्या कळंबोली गावातील मुलीच्या कुटुंबियांकडे साखरपुडा होऊन लग्न नक्की झाल्यानंतर दहा तोळ्यांचे गंठण व पाच लाख रुपये रोख हुंड्याची मागणी करण्यात आली होती. हुंड्यामुळे लग्न मोडल्यानंतर  मुलीने पडघा पोलिसांत मुलासह त्याच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडित मुलीचा १२ मार्च रोजी दोन्हींकडील नातेवाईकांच्या साक्षीने साखरपुडा झाला होता. एवढेच नाही तर १ मे रोजी दोघांच्या लग्नाची तारीख देखील ठरविण्यात आली होती. मुलीकडील मंडळी लग्नाच्या तयारीला लागले. खरेदीस सुरवात झाली. साड्या, मानपानाचे कपडे, मुलाचे कपडे, सोने खरेदी करून लग्नपत्रिका छापून त्या नातेवाईकांना वाटण्यास सुरवात झाली. मात्र, मुलाकडील मंडळींनी हुंड्याची मागणी केली.

मुलीला मुंबई येथे भेटण्यास बोलावून मुलाने  तिच्याकडे लग्नात दहा तोळ्याचे गंठण व पाच लाख रोख हुंड्याची मागणी केली. हुंडा न दिल्यास लग्न करणार नाही, असेही त्याने सांगितलं. या हुंड्याच्या मागणीने गर्भगळीत झालेली मुलीने आपल्या कुटुंबियांना ही हकीकत सांगितली. त्यानंतर मुलाची व त्याच्या कुटुंबीयांची समजूत काढण्यासाठी काही नातेवाईकांनी प्रयत्न केला. पण, मुलाकडील मंडळींनी अट्टाहास कायम ठेवल्यामुळे संतप्त झालेल्या मुलीने नवऱ्या मुलाच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.

पडघा पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीनंतर हुंडा प्रतिबंधक कायद्याविरोधात नवरा मुलगा आणि कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलगा किशोर भास्कर वेखंडे, वडील भास्कर शिवराम वेखंडे, भाऊ किरण भास्कर वेखंडे, बळीराम सापळे, यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हुंड्याची मागणी करणारे हे कुटुंबीय घराला कुलूप लावून सध्या फरार झाले आहेत.