लेडीज बारमधून जप्त करण्यात आलेल्या डायरीतील ‘हप्त्यां’च्या यादीत नावे आढळल्याने शीळ-डायघर पोलीस ठाण्यातील तब्बल ४९ पोलीस कर्मचाऱ्यांची एकाच वेळी बदली करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालयात रुजू होण्याचे आदेश महिनाभरापूर्वी देण्यात आले असले, तरी लेडीज बारवरील कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने तसेच संबंधित बारकडून पैसे घेतल्यानेच त्यांना डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पार करण्यात आल्याचे आता स्पष्ट होत आहे.
शीळफाटा येथील लकी कंपाऊंड दुर्घटनेतील इमारतीच्या बांधकाम व्यावसायिकाकडून पैसे घेतल्याच्या आरोपानंतर शीळ-डायघर पोलीस ठाणे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यातच या ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या परिसरातील लेडीज बार आणि अवैध धंद्यांना पायबंद घालण्यात अपयश आल्यामुळे या पोलीस ठाण्याच्या कारभारावर नेहमीच प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले आहे. मात्र, आता तर या पोलीस ठाण्यातील अनेक कर्मचाऱ्यांची ‘हप्तेखोरी’ उघड करणारी डायरीच पोलिसांच्या हाती लागली आहे. सुमारे महिनाभरापूर्वी या परिसरातील ‘उत्सव’ बारवर ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेने छापा घातला होता. त्यामध्ये २६ बारबालांसह ४६ जणांवर कारवाई करण्यात आली. यावेळी संबंधित बारच्या मालकाची डायरीही पोलिसांच्या हाती लागली होती. या डायरीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. एस. पवार यांच्या नावापुढे ३० हजार, तर पोलीस निरीक्षक उदय जाधव यांच्या नावापुढे दहा हजारांच्या आकडय़ाची नोंद होती. त्याप्रमाणे अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचीही नावे या डायरीत आढळली. त्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी या पोलीस ठाण्यातील ४९ पोलीस कर्मचाऱ्यांची बदली करत त्यांना मुख्यालयात रुजू होण्याचे आदेश दिले. डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर.एस.पवार आणि पोलीस निरीक्षक उदय जाधव यांची यापूर्वीच मुख्यालयातील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. पवार यांच्याजागी कापुरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काटकर यांच्याकडे डायघर पोलीस ठाण्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. काटकर यांच्या दिमतीला तब्बल ४० कर्मचाऱ्यांची नवी टीम तैनात करण्यात आली आहे. एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एक पोलीस निरीक्षक, दोन सहायक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, ११ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,  २४ हेड कॉन्स्टेबल , ३७ पोलीस नाईक , २३ पुरुष आणि ११ महिला पोलीस कॉन्स्टेबल असे पोलीसबळ येथे आहे.
‘बार’पायी वारंवार बदल्या
*शीळ डायघर येथील लकी कंपाऊंडमधील इमारत कोसळून ७४ नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर, ही दुर्घटनाग्रस्त इमारत उभी राहात असताना पोलिसांनी पैसे घेतल्याचे समोर आले होते. याप्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
*ही इमारत उभी राहात असताना त्याकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.पी. नाईक आणि दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक अशोक जगताप यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, सहा महिन्यांतच त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई झाली.
*एका बारविरोधात तक्रारी पुढे आल्या होत्या. मात्र, स्थानिक पोलीस कारवाई करीत नसल्यामुळे राज्याचे पोलीस महासंचालकांच्या पथकाने डायघरमधील या बारवर छापा टाकला होता.
*त्यानंतर जगताप यांच्या जागी आर.एस. पवार यांच्याकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदाची सूत्रे देण्यात आली. मात्र त्यांनाही ठाणे विशेष शाखेची उत्सव बारवरील कारवाई भोवली आहे.