समाज माध्यमांतील फसवणुकीचे प्रमाण रोखण्यासाठी पोलिसांचे विशेष अभियान

हर एक फ्रेंड जरूरी होता है.. अशी जाहिरात तरुणाईला भुलवत आहे. मात्र समाज माध्यमांमध्ये (सोशल मीडिया) अनोळखी व्यक्तीशी मैत्री करणे किती धोकादायक आहे, हे अलीकडील अनेक घटनांवरून सिद्ध झाले आहे. यामुळे ‘हर एक फ्रेंड जरूरी नहीं होता’, असे अभियान आता पोलिसांनी राबविण्यास सुरुवात केली आहे. नुकताच नालासोपारा आणि विरार येथे दोन तरुणी फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅपवरील मैत्रीला भुलल्या आणि त्यांच्या अनोळखी मित्रांनी त्यांच्यावर बलात्कार केला. अशा घटनांच्या वाढत्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी हे अभियान सुरू करून तरुणाईमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.

सध्या समाज माध्यमांच्या साहाय्याने अनेक जण अनोळखी व्यक्तीशी मैत्री करतात. अनेकदा या अनोळखी मित्रांना आपल्या खासगी व वैयक्तिक गोष्टी सांगितल्या जातात. त्याचा काही जण गैरफायदा घेतात. काही तरुणांना समाज माध्यमांच्या साहाय्याने प्रेमाच्या जाळय़ात ओढले जाते आणि त्यानंतर त्यांच्यावर लंगिक अत्याचार केले जातात. त्याशिवाय अनेक जणांची आर्थिक फसवणूकही करण्यात येते. त्यामुळे फेसबुकवर मैत्री करताना सावध राहा, असे आवाहन पालघर जिल्ह्य़ाच्या पोलीस अधिक्षिका शारदा राऊत यांनी केले आहे. मुंबई पोलिसांनी ‘हर फ्रेंड जरूरी होता है’ या प्रसिद्ध जाहिरातीच्या वाक्याला ‘एन्काऊंटर’ करत ‘हर एक फ्रेंड जरूरी नहीं होता’, असे वाक्य असलेले भित्तिपत्रक काढले आहे. जागोजागी महाविद्यालय, हॉटेल आदी ठिकाणी लावून त्याद्वारे जनजागृती केली जात आहे.

मुलगी पळाली

वसईत राहणारी आणि वैद्यकीय शाखेत शिक्षण घेणारी एक १९ वर्षीय मुलगीे आपल्या फेसबुक मित्रासोबत पळून गेल्याचीे घटना नुकतीेच उघडकीस आलीे आहे.

फेसबुकवर आपण प्रायव्हसी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या सर्व बाबी आपण फेसबुकवर टाकत असतो त्यामुळे त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. फेसबुवकर काहीच गोपनीय राहात नाही. फेसबुकवर अनेक जण बोगस ओळख असेलले प्रोफाइल बनवून मैत्री करत असतात. त्यांचा उद्देश फसवणूक हाच असतो.

डॉ. धनंजय कुलकर्णी, मुंबई पोलिसांचे प्रवक्ते.

सध्याच्या मुलांकडे व्हॉटसअ‍ॅप आणि फेसबुक आदी माध्यमे सहज उपलब्ध झाली आहेत. त्यांच्या हातात स्मार्टफोन असतो. अर्थात त्याची गरज असली तरी त्याचा गैरवापर होत असतो. त्यामुळे या शाळकरी मुलांकडील स्मार्टफोन पालकांनी काढून तरी घ्यावेत अन्यथा त्यावर कसून लक्ष ठेवण्याची गरज आहे.

शारदा राऊत, पोलीस अधिक्षिका, पालघर