वसई पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई विनोद पारधी (३०) यांनी समुद्रात उडी मारून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी सकाळी पाणजू येथील समुद्रकिनारी त्यांचा मृतदेह आढळून आला. एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांना नुकतेच निलंबित करण्यात आले होते.
वसई पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले विनोद शनिवार सायंकाळपासून घरी परतले नव्हते. त्यांच्या पत्नीने विनोद बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. विनोद यांचा शोध सुरू असतानाच नायगाव येथील पाणजू बेटाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. विनोद पारधी यांनी समुद्रात उडी मारून आत्महत्या केल्याचे वसई पोलिसांनी सांगितले. एका महिला सहकाऱ्याला अश्लील शिव्या दिल्याप्रकरणी पारधी यांना नुकतेच निलंबित करण्यात आले होते व त्यांची विभागीय चौकशीही सुरू होती, असे पालघर जिल्ह्य़ाच्या पोलीस अधीक्षक शारदा राऊत यांनी सांगितले. या कारवाईमुळे त्यांनी वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या केली असावी, असा कयास आहे. विनोद पारधी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, वरिष्ठांच्या जाचामुळे पारधी यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, अधीक्षक शारदा राऊत यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.