ठाणेकरांच्या दारात शुभेच्छापत्रे, पणत्यांच्या भेटी; दिवाळी पहाट, किल्ले स्पर्धाच्या माध्यमातून संपर्काचा प्रयत्न

ठाणे महापालिकेच्या येत्या चार महिन्यांत होऊ घातलेल्या निवडणुकीच्या तोंडावर यंदाची दिवाळी राजकारण्यांसाठी सुवर्णसंधी ठरत असून आपापल्या प्रभागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी दिवाळीची शुभेच्छापत्रे, भेटवस्तू, पणत्या, कंदील यांचे वाटप करण्याचा धडाका सर्व पक्षांच्या विद्यमान नगरसेवक व निवडणूक इच्छुक उमेदवारांनी लावला आहे. विशेष म्हणजे प्रभाग रचनांमध्ये बदल झाल्यामुळे आता या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी काही मंडळींनी खासगी कंपन्यांची मदत घेण्यास सुरुवात केली आहे. ठाण्यातील अनेक भागांमध्ये दिवाळी पहाट, किल्लेबांधणी स्पर्धासारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रतिमा संवर्धनाचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

शहरातील विकास कामांमुळे मतदारांना खूश ठेवण्यात अपयशी ठरलेली अनेक मंडळी सणउत्सवांचा आधार घेऊन आपली चांगली प्रतिमा लोकांसमोर निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे मतदारसंघात आपली ओळख निर्माण करण्यासाठी नवीन उमेदवार दिवाळीला माध्यम म्हणून वापरत आहेत. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीला अद्याप तीन महिने अवकाश असला तरी डिसेंबरपासून निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची चर्चा आहे. या पाश्र्वभूमीवर दिवाळीतच मतदारांपर्यंत पोहोचण्याची संधी उमेदवारांनी साधली आहे. नौपाडा, भास्कर कॉलनी, घोडबंदर या भागांमध्ये उटणे, पणत्या, शुभेच्छापत्र, दिवाळी अंक, आकाशकंदील, रांगोळ्यांची पाकिटे, चॉकलेट आणि मिठाईचे वाटप सुरू आहे. वागळे इस्टेटसारख्या परिसरातील वस्त्यांमध्येही असे प्रकार पाहायला मिळत आहेत. घरोघरी अशा छोटय़ाछोटय़ा भेटवस्तूंची रेलचेल आहे. काही नेतेमंडळींनी याची जबाबदारी खासगी संस्थांकडे सोपवली आहे. या संस्थांचे कर्मचारी नागरिकांच्या दारात भेटवस्तू पोहोचवत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी ही मंडळी बंद दारातच अशा वस्तू ठेवून पोबारा करत असल्याने, त्या नेमक्या कुणी दिल्या, हेही नागरिकांना कळेनासे झाले आहे.

दिवाळीच्या निमित्ताने..

राजकीय पक्षांकडून किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन मोठय़ा प्रमाणात झाल्याचे यंदा दिसून येत असून या माध्यमातून लहान मुले आणि तरुणांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. केवळ शिवसेनाच नव्हे तर भाजप आणि इतर पक्षांतील मंडळींनीही यंदा किल्ले बांधणी स्पर्धेचे मोठय़ा प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. काही ठिकाणी रांगोळ्यांचे प्रशिक्षणाचे आयोजन करून महिलांना एकत्र आणले जात आहे. तर दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या माध्यमातून दिवाळीच्या पहाट आणि पुढील चार दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाची जंत्री नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.