राजकीय नेत्यांच्या दौऱ्यानिमित्त बुजवण्यात आलेले खड्डे दोन दिवसांत पूर्वस्थितीत
डॉ. बाबासाहेब आंबेडरकर यांच्या पुतळय़ाच्या अनावरणानिमित्त मीरा-भाईंदरमध्ये रविवारी केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री यांसह अनेक मोठे राजकीय नेते आले. या मंत्र्यांच्या, नेत्यांच्या दौऱ्यानिमित्त शहरातील रस्ते चकाचक करण्यात आल्याने शहरवासीय खूश झाले. मात्र त्यांचा हा आनंद केवळ दोन दिवसांचाच होता. मंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त बुजवण्यात आलेले खड्डे दोन दिवसांनंतर उखडले आहेत. केवळ मंत्र्यांना दाखविण्यासाठीच रस्ते चकाचक करण्यात आले होते का, असा संतप्त सवाल भाईंदरवासीय विचारत आहेत.
यंदाच्या पावसाळय़ात मीरा-भाईंदरमधील रस्त्यांची पार वाट लागली. येथील नागरिक गेल्या महिन्यापासून खड्डय़ांचा त्रास सोसत आहेत. वरिष्ठ नागरिक, गर्भवती महिला यांना त्याचा सर्वाधिक त्रास होत आहे, तसेच वाहनेदेखील नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. मात्र प्रशासनावर त्याचा कोणताही परिणाम होत नव्हता. मात्र गेल्या आठवडय़ात शनिवारी भाईंदर पश्चिम येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ झाला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले तसेच खासदार व आमदार यांनी उपस्थिती होती. अतिमहत्वाच्या व्यक्ती मोठय़ा संख्येने कार्यक्रमाला उपस्थित रहाणार म्हटल्यावर रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांच्या बाबतीत प्रशासन खडबडून जागे झाले आणि कार्यक्रमाच्या एक दिवस अगोदर मंत्रीमहोदयांची मार्गक्रमणा असेलेले रस्ते प्रशासनाने खड्डेमुक्त केले. मंत्रीमहोदयांच्या आगमनाने का होईना किमान मुख्य रस्ता तरी खड्डेमुक्त झाला या आनंदात नागरिक होते. परंतु नागरिकांचा हा आनेद अवघे दोन दिवसत टिकला. कारण कार्यक्रमाच्या अगोदर भरलेले खड्डे कार्यक्रम उलटून चोवीस तास होत नाहीत, तोच पुन्हा उखडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हे खड्डे केवळ मंत्र्यांचे आगमन सुसह्य व्हावे यासाठीच भरण्यात आले होते का, असा संतप्त सवाल नागरिक करू लागले आहेत.