पावसाळा तोंडावर आला असतानाही डोंबिवली शहरातील प्रमुख रस्त्यांवर जागोजागी खड्डे दिसू लागले असून पावसाळ्यापुर्वी हे खड्डे बुजविले जातील, हा महापालिका प्रशासनाचा दावा तूर्तास फोल ठरल्याचे चित्र आहे. दोन दिवसांपासून सुरू झालेल्या वळवाच्या पावसात रस्त्यांवर जागोजागी डबके साचू लागल्याच्या तक्रारी आहेत. शहरातील इंदिरा चौक, सुभाष रोड, कर्वे रोड, उमेशनगर, जुनी डोंबिवली, कोपर आदी परिसरातील रस्त्यांवर मोठे खड्डे असून यामुळे पावसाळ्यात मोठय़ा अपघातांची भीती व्यक्त होत आहे.

कल्याण-डोंबिवली शहरातील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात तब्बल १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दर वर्षी पावसाळ्यात ही शहरे खड्डेमय होतात, असा अनुभव आहे. त्यामुळे या वर्षी तरी पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील रस्तेदुरुस्तीची कामे सुरू होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात डोंबिवली शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर मोठे खड्डे दिसू लागल्याने आपल्यापुढे पावसाळ्यात काय वाढून ठेवले आहे याचा अंदाज प्रवाशांना येऊ लागला आहे.

प्रमुख रस्त्यांवरील खड्डे अद्याप बुजविले नसल्याने पहिल्याच पावसात त्यामध्ये पाणी साचल्याचे दिसून आले. पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचले की खड्डय़ांच्या खोलीचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. यामुळे अपघात घडण्याची भीती असते. त्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. येथील इंदिरा चौक, सुभाष रोड, नवापाडा, कर्वे रोड, उमेशनगर या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.