मुंब्रा-शीळ मार्गावरील कोंडीमुळे नवी मुंबईतही वाहनांच्या रांगा

मुंब्रा रेतीबंदर येथील बाह्यवळण मार्गाच्या पायथ्याशी दोन्ही बाजूला मोठे खड्डे पडल्याने येथून भिवंडी, गुजरात आणि पनवेलच्या दिशेने होणारी अवजड वाहतूक बुधवारी संथगतीने सुरू होती. परिणामी, या मार्गावर अवजड वाहनांच्या लांब रांगा लागल्याने शीळफाटा, कल्याण आणि नवी मुंबईतील महापे येथील रस्त्यांवर प्रचंड कोंडी झाली होती. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या नोकरदारवर्गाला वाहतूक कोंडीचा फटका बसला. दुपारनंतरही या मार्गावर कोंडी तशीच होती.

उरण येथील जवाहरलाल नेहरू बंदरातून गुजरात आणि भिवंडीतील गोदामांच्या दिशेने होणाऱ्या वाहतुकीसाठी शीळफाटा आणि मुंब्रा बाह्य़वळण मार्ग महत्त्वाचा मानला जातो. मुंब्रा रेतीबंदर येथील बाह्यवळण मार्गाच्या पायथ्याशी दोन्ही बाजूला मोठे खड्डे पडले असून या खड्डय़ांमुळे वाहन उलटून अपघात होऊ  नये म्हणून चालक वाहन संथगतीने चालवितात. तसेच खड्डय़ांमुळे या पायथ्याच्या दोन्ही मार्गिकांवर प्रत्येकी एकच अवजड वाहन वाहतूक करते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावर खड्डे पडल्यामुळे या ठिकाणी अवजड वाहनांची मोठी कोंडी होऊ लागली आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे या खड्डय़ांमध्ये पाणी साचले असून यामुळे मंगळवारी रात्रीपासून या मार्गावर वाहतूक संथगतीने सुरू होती. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी आठ वाजता या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात येणार होती. मात्र रात्रीच्या वेळेस या मार्गावर आलेली अवजड वाहने खड्डय़ांमुळे सकाळपर्यंत शहराबाहेर पडू शकली नाहीत. त्यात सकाळी कामावर निघालेल्यांची वाहने रस्त्यावर आल्याने या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. अनेकांनी विरुद्ध मार्गावर वाहने चालविण्याचा प्रयत्न केल्याने कोंडीत भर पडली. त्यातच सकाळी ११ वाजता या मार्गावर पुन्हा अवजड वाहतूक सुरू झाली. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या.

खड्डे बुजवणार कोण?

मुंब्रा-शीळ मार्ग ठाणे महापालिका, रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम अशा तीन विभागांच्या अंतर्गत येतो. परंतु, रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवायचे कोणी, यावरून या तिन्ही यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे हे खड्डे अद्याप बुजविण्यात आलेले नाहीत. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र या विभागाने अजूनही खड्डे बुजविलेले नसल्यामुळे नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागतो आहे, असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.