ठाण्यातील रस्त्यांची दिवसेंदिवस दुर्दशा;  पालिका प्रशासनाकडून अद्याप पाहणीही नाही

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहरातील रस्त्यांची अतिशय खराब अवस्था झाली असून खड्डे बुजवण्याच्या नावाखाली करण्यात येणारे ‘खडीकाम’ वाहनचालक व पादचाऱ्यांसाठी आणखी तापदायक ठरू लागले आहे. नितीन कंपनी, तीन हात नाका, कॅडबरी जंक्शन, गोखले रोड, लोकमान्य नगर, सावरकरनगर, वागळे इस्टेट, कळवा, कापुरबावडी, बाळकुम या भागांत प्रामुख्याने रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे, एरवी विकासकामांच्या आढावा घेण्यासाठी रस्त्यावर उतरणारे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी नव्या कोऱ्या रस्त्यांवर पडलेले हे खड्डे पाहाण्यासाठी कधी दौरे काढणार असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत.

ठाणे शहरात घरापासून रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाण्यासाठी रिक्षा, दुचाकींचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या बरीच मोठी आहे. जागोजागी पडलेल्या खड्डय़ांमुळे हा प्रवास आता दुचाकीस्वारांना नकोसा ठरू लागला आहे. पावसाळ्यापूर्वी जुनी कामे मार्गी लावण्याची घोषणाही एव्हाना फोल ठरली आहे.  वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणारा गोखले रस्ता महापालिकेच्या कामामुळे ठिकठिकाणी खोदून ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने आधीच प्रवाशांचे हाल सुरू आहेत. त्यातच भास्कर कॉलनी येथे नव्याने पडलेल्या खड्डय़ांमुळे दुचाकीस्वारांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.  विशेष म्हणजे गोखले रस्त्यावर भरपावसात काम सुरू असल्याने नागरिकांना आणखी मनस्ताप सोसावा लागत आहे. या खड्डय़ांमुळे वाहतूककोंडीत भर पडत असून सायंकाळच्या वेळी तासन्तास वाहनकोंडी होत असते.

नितीन चौकातून लोकमान्यनगर, वागळे इस्टेट परिसरात प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी या सिग्नलजवळचे खड्डे जीवघेणे ठरत आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या नितीन चौकात मोठय़ा प्रमाणात खड्डे आहेत. सावरकरनगर, कामगार चौक, यशोधननगर, शास्त्रीनगर या भागातील खड्डे अद्याप बुजवण्यात आलेले नाहीत. ढोकाळी येथील शरदचंद्र पवार इनडोअर स्टेडिअमसमोरील रस्त्यावर दोन महिन्यांपूर्वीच डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, आता या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत.

रहदारीचा नाही तरी खड्डेमय

मुख्य शहरापासून लांब पल्ल्यावर असलेला उपवन परिसर रहदारीचा नसला तरी या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात खड्डे आहेत. या परिसरात सातत्याने दुचाकीस्वारांची स्टंटबाजी सुरू असल्याने नागरिकांच्या प्रवासात आणखी धोका निर्माण होत आहे. उपवन परिसरात रस्ता रुंद असला तरी या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात असणाऱ्या खड्डय़ांमुळे शतपावलीसाठी येणाऱ्या वृद्ध नागरिकांना याचा त्रास होत आहे.

मास्टिक अस्फाल्टरस्त्यांची चौकशी..

ठाणे आणि मुलुंड शहराचे प्रवेशद्वार असलेल्या मॉडेला चेक नाका आणि तीन हात नाका भागात काही वर्षांपूर्वी मास्टिक अस्फाल्ट पद्घतीने रस्ते तयार करण्यात आले. हे रस्ते पाच वर्षांपर्यंत सुस्थितीत रहाणे अपेक्षित असते. मात्र, त्याआधीच या रस्त्यांवर खड्डे पडल्याची बाब शिवसेनेचे नगरसेवक विकास रेपाळे यांनी गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत उघड केली. संपूर्ण शहरामध्ये अशा प्रकारची कामे एकाच ठेकेदारामार्फत केली जात असल्याने या कामामध्ये गैरप्रकार झाला असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यानुसार महापौर मीनाक्षी शिंदे यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

मुंब्रा, कळवाही खड्डय़ांत

कळव्यातील पारसिकनगर ते ९० फीट रोड पर्यंत अंदाजे दीड किलोमीटर रुंदीचा रस्ता खोदण्यात आला होता. ऐन पावसाळ्यात खोदलेल्या या रस्त्यांमुळे परिसरात चिखल झाला आहे. कळवा पूल, मुंब्रा रेतीबंदर परिसरातही तसेच मुंंब्रा बाह्य़वळण मार्गावर खड्डे आहेत.