ठाणे महापालिकेचा आता दसऱ्याचा मुहूर्त

ठाणे शहरात पावसाने उघडीप घेऊनही इतके दिवस खड्डे बुजविण्यात अपयशी ठरलेल्या महापालिका अभियांत्रिकी विभागाला मंगळवारी दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे आयते निमित्त सापडले आहे. सातत्याने कोसळत असलेला पाऊस आणि वेधशाळेकडून मिळत असलेले इशारे लक्षात घेता दसऱ्यानंतरच खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली जाईल, अशी माहिती अभियांत्रिकी विभागातील सूत्रांनी दिली. वारंवार खड्डे बुजवूनही पुन्हा पाऊस पडताच रस्ते उखडतात असे कारण दिले गेले आहे.

यंदा पावसाळ्यात जुलै महिन्याच्या मध्यापासूनच शहरातील वेगवेगळ्या भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. मुंबईत रस्त्यांची अवस्था अगदीच बिकट असताना विकासकामांच्या मोठय़ा गप्पा करणाऱ्या ठाणे महापालिका रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवेल, अशी अपेक्षा येथील रहिवाशांना होती. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही सुरुवातीला यासंबंधी कठोर भूमिका घेतली होती. शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्ते आणि महामार्गावरही खड्डे पडल्याने गेल्या काही महिन्यांपासून वाहतुकीचा वेगही मंदावला आहे. शहरातील बांधकाम व्यावसायिकांसाठी आवडते केंद्र ठरलेल्या घोडबंदर मार्गावर आणि कडेलाही रस्ते उखडले गेले आहेत. असे असताना पावसाने विश्रांती घेऊनही खड्डे बुजविण्यात अभियांत्रिकी विभागाला फारसे यश मिळाले नसल्याचे चित्र आहे.

सणासुदीचा काळ खड्डय़ातच

मागील काही दिवसांपासून सातत्याने पावसाची रिपरिप सुरू आहे. असे असले तरी सणासुदीच्या काळात शहरातील रस्ते नीटनेटके असावेत, अशी ठाणेकरांची अपेक्षा होती. पावसाने विश्रांती घेतल्याने कोणत्याही परिस्थितीत खड्डे बुजवावेत असे आदेश मध्यंतरी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. गणेशोत्सवात सुरुवातीच्या काळात सर्वत्र मुसळधार पाऊस होता. विसर्जन काळात मात्र पावसाने उघडीप घेतली होती. तरीही खड्डे बुजविण्यात अभियांत्रिकी विभागाला यश मिळाले नव्हते. मध्यंतरी जेटपॅचरच्या माध्यमातून खड्डे बुजविण्याची कामे महापालिकेने हाती घेतली होती. मात्र हे अत्याधुनिक तंत्रज्ञान फारसे प्रभावी ठरत नसल्याच्या तक्रारी आता नगरसेवकांकडून केल्या जात आहेत. मास्टिक अस्फॉल्टच्या रस्त्यांना पुढील किमान पाच वर्षे तरी काही होणार नाही, असादेखील दावा पालिकेकडून केला जात होता; परंतु हे रस्तेदेखील पावसामुळे उघडल्याने अभियांत्रिकी विभागाचे पितळ उघडे पडले आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचे पितळ उघडे

सणासुदीच्या काळात शहरातील रस्ते निटनेटके असावेत, अशी ठाणेकरांची अपेक्षा होती.  गणेशोत्सवात सुरुवातीच्या काळात सर्वत्र मुसळधार पाऊस होता. विसर्जन काळात मात्र पावसाने उघडीप घेतली होती. तरीही खड्डे बुजविण्यात अभियांत्रिकी विभाग अपयशी ठरला. मध्यंतरी जेटपॅचरच्या माध्यमातून खड्डे बुजविण्याची कामे महापालिकेने हाती घेतली होती. मात्र, हे अत्याधुनिक तंत्रज्ञान फारसे प्रभावी ठरत नसल्याचे प्रकर्षांने दिसून आले आहे. मास्टीक अस्फॉल्ट केलेल्या रस्त्यांवर किमान पाच वर्षे  काही होणार नाही, असा दावा पालिकेने केला होता. परंतु हे रस्ते देखील पावसामुळे खराब झाले आहेत.

खड्डय़ांबाबत अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

पालिकेने आतापर्यत १० प्रभाग समितीमधील १८१४ खड्डे भरले असल्याची, माहिती अभियांत्रिकी विभागातील वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे. सद्यस्थितीत महापालिका हद्दीत केवळ २५८ खड्डे शिल्लक असल्याचा दावा केला जात आहे. हे खड्डे बुजविण्यासाठी दसऱ्यानंतरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. वेधशाळेकडून सातत्याने पावसासंबंधी अनुमान नोंदविले जात असल्याने तात्पुरते खड्डे बुजविण्यात अर्थ नसल्याचे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.