दोन दिवसांच्या पावसामुळे ठाण्यातील रस्त्यांची चाळण

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ठाणे आणि कळवा शहरांतील बहुतांश रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून खड्डे बुजवल्याचे पालिकेच्या अभियांत्रिकी विभागाचे दावे खोटे ठरले आहेत. गणेशोत्सवापूर्वी शहरातील सर्व खड्डे बुजवण्यात येतील, असे पालिकेने जाहीर केले असले तरी, एकूण खड्डे पाहता हे अशक्य असल्याचे नागरिकांचे मत आहे. त्यामुळे यंदा विघ्नहर्त्यांच्या आगमनाची वाट खडतर असणार आहे.

जुलै महिन्याच्या मध्यंतरापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसात ठाणे, कळवा तसेच मुंब्रा शहरात जागोजागी रस्त्यांवर खड्डे पडले होते. या खड्डय़ांमधून प्रवास करावा लागत असल्याने ठाणेकर हैराण झाले होते. मध्यंतरी पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्यापूर्वी शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची तत्परता पालिकेने दाखवली होती. परंतु, ही तात्पुरती मलमपट्टी असल्याचे गेल्या दोन दिवसांपासूनच्या पावसामुळे सिद्ध झाले आहे. ठाण्याच्या मध्यवर्ती परिसरासह घोडबंदर, वागळे इस्टेट, कळवा, वर्तकनगर, मुंब्रा, दिवा या सर्वच भागांतील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याचे दिसून येत आहे.

ठाणे तसेच घोडबंदर शहरातील वाहतुकीसाठी मुंबई-नाशिक महामार्ग महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. तीन हात नाका उड्डाण पूल आणि माजिवाडा या उड्डाणपुलावरही खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकविण्याच्या नादात या ठिकाणी वाहनांचा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या तीन पेट्रोल पंप परिसरातील रस्त्यावर खड्डे पडले आहेत तर रस्त्याच्या काही भागाची अक्षरश: चाळण झाली आहे. मीनाताई ठाकरे चौक, अल्मेडा मार्ग आणि हरिनिवास या भागात तीन उड्डाण पुलांची कामे सुरू असून या पुलाशेजारी वाहतुकीसाठी असलेल्या रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. वागळे इस्टेट भागातील साठेनगर, इंदिरानगर, सावरकरनगर, लोकमान्यनगर, नितीन कंपनी, कोर्ट नाका, कोपरी, घोडबंदर, कळवा तसेच मुंब्रा या भागातील रस्त्यांवर खड्डे दिसून येतात. महापालिकेने काही दिवसांपूर्वी बुजविलेले खड्डेही या पावसामुळे पुन्हा उखडले आहेत तर काही ठिकाणी नवीन खड्डे पडले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे शहरात पुन्हा खड्डे पडले असून हे खड्डे बुजविण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. खडी, पेव्हर ब्लॉक आणि जेट पॅचर यंत्राच्या साहाय्याने खड्डे बुजविण्यात येत आहेत. गणेशोत्सवापूर्वी शहरातील सर्व खड्डे बुजविण्यात येतील.

–  रतन अवसरमोल,शहर अभियंता, ठाणे महापालिका