जमिनीत पाणी मुरविण्यासाठी ठोस पावले उचलत डोंबिवली शहरात सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल ५५ शोष खड्डे तयार करण्यात आले आहेत. तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा आत्तापासूनच जमिनीत पाणी मुरविण्याची सुविधा केली तर पुढील वर्षी पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येऊ नये यासाठी  महिनाभरापूवी या  प्रकल्पाच्र्या सुरुवात करण्यात आली होती.

गेल्या वर्षी राज्यभर कमी पाऊस पडल्याने गेल्या काही महिन्यांपासून कल्याण डोंबिवलीकरांना तीव्र अशा पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. केवळ पाऊस आणि धरणातील पाणी साठय़ावर अवलंबून राहिल्यास पाणीटंचाईचा कधीही सामना करावा लागू शकतो. हे लक्षात आल्याने डोंबिवलीतील सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन यंदा पाणी जमिनीत मुरविण्यासाठी विविध प्रकल्पांची आखणी केली आहे. यंदा पाणी कमी पडू लागताच महापालिका प्रशासनाने आपला मोर्चा शहरातील विहिरी आणि कूपनलिकांकडे वळविला. शहरात मोठय़ा प्रमाणावर झालेल्या कँाक्रिटीकरणामुळे ही वेळ ओढावली असून गेल्या काही वर्षांत भूजल पातळीत वाढ व्हावी यासाठी ठोस प्रयत्न झाले नसल्याचे चित्र आहे.यासाठीच  भारत विकास परिषदेच्या डोंबिवली शाखेच्या वतीने पावसाळा सुरू होण्यापूर्वी डोंबिवली शहरात १५० शोष खड्डे खणण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

गेल्या महिनाभरात परिषदेच्या वतीने ५५ शोष खड्डे खणण्यात आले आहेत. यात डीएनसी शाळेच्या पटांगणात १४ खड्डे, नेहरु मैदानात ७ खड्डे, स.वा.जोशी शाळेच्या पटांगणात ५ ते ७, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर, रिजन्सी परिसरातील साईधारा सोसायटी, विद्यानिकेतन शाळा, गणेश मंदिर संस्थानचे निर्माल्य प्रकल्प आदी परिसरात हे खड्डे तयार करण्यात आले आहेत.एका खड्डय़ाच्या माध्यमातून ५० हजार लीटर पाणी जमिनीत मुरेल असा निष्कर्ष आहे.यामुळे  पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.  या शोष खड्डयामागे पाच हजार रुपये खर्च येत असून या संपूर्ण प्रकल्पासाठी साडेतीन लाख खर्च आल्याचे संस्थेचे पदाधिकारी प्रवीण दुधे यांनी सांगितले.