इक्बाल कासकर खंडणी प्रकरणातील तपासाला गती आली असून याप्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची चिन्हे दिसत आहेत. दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल याला अटक केल्यानंतर मंगळवारी त्याला ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या समोर उभे करण्यात आले. मात्र, इक्बालने मौन बाळगल्यामुळे या प्रकरणातील गूढ अद्याप कायम आहे.

या प्रकरणात पालिकेतील दोन नगरसेवकांचा समावेश असल्याच्या पार्श्वभूमीवर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी बुधवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल याची भेट घेतली. या दोन अधिकाऱ्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असेल, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
ठाण्यातील बिल्डरकडून खंडणी उकळल्याप्रकरणी इक्बाल कासकर याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केल्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी विविध पथके तयार करण्यात आले आहेत. तसेच हे प्रकरण गंभीर आणि संवेदनशील असल्यामुळे पोलिसांना तपासासाठी सशस्त्र जावे लागत आहे. या प्रकरणात ठाण्यातील दोन नगरसेवकांचाही समावेश असल्याचा संशय पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी वर्तवल्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये संशयकल्लोळ सुरु झाला आहे.

बुधवारी सायंकाळी ६ वाजता चहापानाच्या बहाण्याने ठाणे महापालिका आयुक्त जयस्वाल आणि खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांची बैठक पालिका मुख्यालयात झाली. ही बैठक दुपारी ठरली होती. मात्र याच प्रकरणाच्या तपासकामासाठी शर्मा यांना नागपाडा येथे जावे लागल्याने तसेच महापालिकेत सर्वसाधारण सभा असल्यामुळे संध्याकाळी ही बैठक पार पडली. बैठकीत नक्की काय चर्चा झाली, हे समजू शकलेलं नाही.