देखावा आणि वास्तवया अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांने मांडलेले मत.

भारतात उद्योजकतेची वानवा नाही, हे पारखून तरुणांच्या कल्पक मेंदूला दाद देणारी ‘स्टार्टअप इंडिया’ ही योजना सरकारने घोषणांचा धुरळा उडवत सुरू केली; पण ही धूळ खाली बसते ना बसते तोच वास्तवाचे दर्शन घडू लागले आहे. कल्पनांमध्ये हवा भरून सर्जनात्मक दिशा दिल्यास नवनिर्मिती करता येते. त्यासाठी हवे असते ते जोखीम घेण्याचे धर्य. ‘नवउद्यम’ याचाच अर्थ मुळात जोखीम घेणे, असा आहे. हे शिवधनुष्य पेलण्याचे धाडस करणारे अनेक जण आज मोठे उद्योगपती बनले आहेत. बिल गेट्स, लॅरी पेज, मार्क झकरबर्ग आणि अंबानी हे आज यशस्वी उद्योगपतींच्या यादीत झळकताना दिसतात. पण वास्तव इतके सरळसोपे असत नाही. अमेरिकेसारख्या देशातही ९० टक्के ‘नवउद्यम’ पूर्णपणे अपयशी होतात. भारतात हे वास्तव अधिकच ज्वलंत बनते. आज जागतिक अर्थव्यवस्था प्रदीर्घ अशा मंदीसदृश स्थितीतून जात आहे. बाजारपेठेचा अभाव, नवउद्यमांचा तकलादू पाया, पुरेसे नियोजन नसल्याने मोठमोठय़ा कंपन्याही गोत्यात आल्या आहेत. त्या अपयशी होण्यामागे बाजारपेठीय मागणीचा अभाव ४२ टक्के तर भांडवलाची कमतरता २९ टक्के या प्रमाणात कारणीभूत आहेत, असे ‘फोर्ब्स’ या नामांकित संस्थेचा अहवाल सांगतो. ही आकडेवारी फार बोलकी आहे, कारण याचे प्रतििबब रोजगारनिर्मितीत दिसते.

भारताच्या वार्षकि आर्थिक पाहणी अहवालानुसार दरवर्षी सव्वा कोटी रोजगारक्षम लोकांची भर पडत असताना, रोजगारनिर्मितीत मात्र घट होत आहे. ‘राष्ट्रीय कामगार ब्यूरो’च्या अहवालानुसार अर्थव्यवस्थेची दिशा निर्धारित करणाऱ्या वस्त्रोद्योग, माहिती तंत्रज्ञान, यांसारख्या महत्त्वाच्या आठ क्षेत्रांमध्ये झालेली रोजगारनिर्मिती २००९ मध्ये १२.५ लाख, २०१४ मध्ये ४.९ लाख तर २०१५ मध्ये १.३५ लाख असा परतीचा प्रवास करणारी आहे. जवळजवळ दोनतृतीयांश रोजगार हे लघू आणि नवउद्यमांतून तयार होतात. सरकारला याची जाण नाही अशातला भाग नाही; पण आकडय़ांचा खेळ करीत सरकार अर्थव्यवस्था अश्वरथावर स्वार असल्याचा देखावा करण्यात धन्यता मानणार असेल, तर हे बुडबुडे फुटायला सुरुवात होणारच होती. टीसीएस, इन्फोसिस, विप्रो यांसारख्या माहिती तंत्रज्ञानातील अग्रगण्य कंपन्यांकडून रोजगाराच्या संधीत घट होत आहे. मोठय़ा प्रमाणात कामगार कपात केली जात आहे. इन्फोसिसने अलीकडेच तीन हजार कर्मचाऱ्यांना निरोप दिला. याला ‘ब्रेक्झिट’सारख्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचीही किनार आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे भारताच्या निर्यातीत आणि रोजगारनिर्मितीत भरीव योगदान आहे. मागील दशकभरात दोन आकडी वाढ नोंदविणारे हे क्षेत्र. त्यासाठी युरोपीय बाजारपेठ अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ही गुंतवणूक इंग्लंडच्या माध्यमातून पार पडते; पण इंग्लंडने युरोपीय संघातून काढता पाय घेतल्याने भारतीय उद्योगांची हक्काची बाजारपेठ हातातून निसटली. परिणामी दोन्हींसाठी वेगवेगळे करार करून बाजारपेठ टिकविण्याची कसरत कंपन्यांना करावी लागत आहे. जागतिक वित्तीय पेचप्रसंग उद्भवून मोठमोठय़ा कंपन्यांचा आíथक डोलारा कोसळत असताना, दर वर्षी सुमारे सव्वा कोटी रोजगारक्षम मनुष्यबळ विकासाच्या गंगेत सामावून घेण्याचे चिंतनसुद्धा सद्य:स्थितीत होताना दिसत नाही, ही चिंतेची बाब आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात २०२१ पर्यंत अत्याधुनिकीकरणाने ६.४ लक्ष नोकऱ्या कमी होतील, अशा अमेरिकास्थित कंपनीने दिलेल्या इशाऱ्याच्या पाश्र्वभूमीवर तर ही बाब अधिकच गंभीर बनते.

दुसरा मुद्दा भांडवलपुरवठय़ाचा. भारतीय बँकिंगप्रणाली विश्वातील काही सर्वोत्तम प्रणालींमध्ये गणली जाते; पण आज भारतीय बँका अतिदक्षता विभागात आहेत, हे सांगण्यासाठी अर्थतज्ज्ञाची गरज नाही. सुमारे पाच लाख कोटी रुपये बुडीत कर्जाच्या ओझ्याखाली दबून त्यांचा चेहरा हरवला आहे आणि ताळेबंद राखण्यात तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशा स्थितीत बँका नवउद्यमांना वित्तपुरवठा करू शकत नाहीत. मुळात उद्योग ही अशी गोष्ट आहे, जी एकतर्फी वरचढ करून साध्य होत नाही. जागतिक वाढीचे वातावरण, पूरक सरकारी धोरणे, कुशल मनुष्यबळ याशिवाय नवउद्यम जोमाने चाल करू शकत नाहीत. जागतिक अर्थव्यवस्था कासवगतीने वाटचाल करीत आहे, हे वास्तव आहे. आणि भारतीय अर्थव्यवस्थाही रेंगाळली आहे, हे त्या वास्तवावरचे विस्तव आहे. नुकत्याच चीनमध्ये झालेल्या जी-२० राष्ट्रांच्या परिषदेत हीच बाब अधोरेखित करण्यात आली. त्यामुळे ओढूनताणून आकडे फुगविण्याचा मोह सरकारने सोडायला हवा. या संख्यासंमोहनाने संभ्रमच निर्माण होईल, जो भरारी घेऊ पाहणाऱ्या नवउद्यमांचा कर्दनकाळ ठरेल, याची सरकारदरबारी नोंद घेतलेली बरी. आज ग्राहक आणि उद्योग यांच्यातील संबंध बऱ्याच अंशी दुराव्याचे आहेत. ग्राहकांची अपेक्षापूर्ती करण्याची वेळ येते तेव्हा, विशेषत: माहिती तंत्रज्ञानातील नवउद्यम मागे पडतात. अशा वेळी ग्राहकाभिमुखतेचे बाळकडू घेऊन भांडवल कमतरतेचा मलाचा दगड पार करणे हेच नवउद्यमांसाठी आव्हान आहे.

प्रवीण अशोक घुगे

(डी. जी. रुपारेल महाविद्यालय, माटुंगा)