अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचे मत

हिंदू, बौद्ध, इस्लाम आणि महावीर यांमधील समन्वयवादी भूमिका आणि एकात्म मूस हे भारतीय राष्ट्रवादाचे विवेकी सामथ्र्य आहे, असे मत ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी मांडले. ते सोमवारी बदलापुरातील स्वायत्त मराठी विद्यापीठाला अनौपचारिक भेट देण्यासाठी आले होते. या वेळी त्यांनी उपस्थित अभ्यासक, लेखक, पत्रकार आदींशी संवाद साधला.

या वेळी श्याम जोशी यांनी बदलापुरात उभ्या केलेल्या स्वायत्त मराठी विद्यापीठाबद्दल बोलताना म्हणाले की, मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या अंतर्प्रवाहातील खुणा या ज्ञानपीठात सुरक्षित आहेत. तसेच हे विद्यापीठ महाराष्ट्राचे शिखरस्थ वैभव आहे. प्रत्येक पिढीने या साधनांचा उपयोग करून मराठी संस्कृती समृद्ध केली पाहिजे. या वेळी भारतीय राष्ट्रवादाबद्दल बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या भूमिकेत काँग्रेस परंपरेतील गांधींमधला महात्मा आणि बुद्धाचा अहिंसावादी विचार आणि महावीराला कवेत घेत जागतिक स्तरावर वाटचाल केल्यास त्यातून भारतीय राष्ट्रवादाचे विवेकी सामथ्र्य दिसून येईल. भारत आर्थिक महासत्ता होईल की नाही हे माहीत नाही. मात्र शांतता व सुरक्षेच्या जागतिक संदर्भात भारतीय दार्शनिकता व महापुरुषांची संवादी बेरीज ही संपूर्ण जगाला आगामी काळात तारणारी असून हीच खरी भारतीय वंदनीय महासत्ता असेल, असे त्यांनी प्रतिपादन केले. या वेळचे पिंपरी येथे होणारे संमेलन हे वेगळ्या अर्थाने खास असणार असून ऐतिहासिक स्वरूपाचे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीच्या शुद्घीकरणाचा ब्राह्मणी आग्रह अकारण

मराठीच्या शुद्धीकरणाचा ब्राह्मणी आग्रह हा अकारण असल्याचे सबनीस यांनी सांगत मातृभाषा मराठीचे महत्त्व कायमच राहणार आहे. त्रिसूत्री भाषा धोरणानुसार भाषा, राष्ट्रभाषा हिंदी आणि जागतिक विज्ञानभाषा इंग्रजी म्हणून आपसांत संघर्ष करण्याचे कारण नाही असे ते म्हणाले. क्षणाक्षणाला आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान बदलत आहे, संगणकात स्थित्यंतरे येत आहेत, त्यामुळे इंग्रजीतले विज्ञान मराठीत आणण्याची किमया त्वरित घडणे कठीण आहे. मात्र शालेय पातळीवरचे मराठीचे शिक्षण विद्यापीठीय अभ्यासक्रमात आले तर ही किमया काही काळाने होऊ शकेल, असे सबनीस अखेरीस म्हणाले.