ज्ञानसाधना महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी विद्यार्थी एकत्र येऊन आपल्या दोन प्राध्यापकांचा दोन मान्यवर विद्यार्थ्यांच्या हस्ते सन्मान करणार आहेत. ज्ञानसाधना शाळेच्या जुन्या इमारतीमधील जिमखान्यामध्ये व्हॅलेंटाइन डे ऐवजी माजी विद्यार्थी आपल्या दोन प्रिय शिक्षकांना समारंभपूर्वक सन्मानित करून कृतज्ञता सोहळा साजरा करणार आहेत.
ज्ञानसाधनाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे युनिट-१ काळ अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरले. माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकत्र येऊन त्या वेळच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. बाळासाहेब खोल्लम आणि प्रा. भारती जोशी यांचा सत्कार करण्याचे ठरविले आहे. ठाण्याचे महापौर संजय मोरे आणि स्थायी समितीचे अध्यक्ष नरेश म्हस्के हे या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून त्यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात येणार आहे. ज्ञानसाधना महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि इतिहासतज्ज्ञ डॉ. दाऊद दळवी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. १९९७ मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेत काम करणारे सर्व जण एकत्र येऊन त्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला आहे.
जुन्या मित्र-मैत्रिणींना भेटता यावे, आठवणी पुन्हा ताज्या व्हाव्यात, असे या कार्यक्रमाचे निमित्त आहे.